74

वायसीएम रुग्णालयाची ओळख की मद्यालय? शवविच्छेदन विभागातील दारू पार्टीप्रकरणी दोषींवर कायमस्वरूपी बडतर्फेची कठोर कारवाई करा — मारुती भापकर यांची आयुक्तांकडे आग्रही मागणी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा दैनंदिन कामकाजात वायसीएम रुग्णालयाचा कारभार नेहमीच चर्चेत असतो. मात्र, काल रात्री मृत व्यक्तीच्या दुःखात असलेल्या काही नातेवाईकांना मृत्यूचा दाखला घेण्यासाठी शवविच्छेदन विभागातील संबंधित डॉक्टर वैभव मस्के यांच्या कार्यालयात जावे लागले होते.
तेथे पोहोचल्यावर जे दृश्य समोर आले, त्याने सर्वांच्या अंगाचा थरकाप उडाला. टेबलवर मद्याने भरलेले ग्लास, चकण्यांचे पदार्थ, जेवणाची ताटे आणि खुद्द डॉ. वैभव मस्के मद्यधुंद अवस्थेत सोफ्यावर झोपलेले निदर्शनास आले. नातेवाईकांनी दाखल्याची मागणी केली असता, त्यांनी अत्यंत अरेरावीची व असभ्य भाषा वापरली. याच वेळी या संपूर्ण गंभीर प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करणाऱ्या नागरिकालाही विरोध करत हुज्जत घालण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,
“एकीकडे रुग्णांच्या जीवासोबत खेळ सुरू असताना, दुसरीकडे शवविच्छेदन विभागासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी मृत व्यक्तींच्या पवित्र जागेची अशा प्रकारे विटंबना करणे अत्यंत निंदनीय आहे. या प्रकारामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि संपूर्ण महाराष्ट्रात वायसीएम रुग्णालयाची प्रतिमा अतिशय डागाळली आहे.”
अशा बेशिस्त, बेजबाबदार आणि कर्तव्यचुकार वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला असून, भविष्यात कुणीही असे गैरकृत्य करण्याचे धाडस करू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तात्काळ उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करावी आणि दोषी असणाऱ्या डॉ. वैभव मस्केसह सर्व संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ (Dismissal) करावे, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
