news
Home पिंपरी चिंचवड ‘पारंपरिक संस्कृतीचा जिवंत वारसा; लोकमान्य हास्य योग संघातर्फे भोंडला सोहळा संपन्न!’

‘पारंपरिक संस्कृतीचा जिवंत वारसा; लोकमान्य हास्य योग संघातर्फे भोंडला सोहळा संपन्न!’

ज्येष्ठ नागरिक व हास्य योग संघाचा स्तुत्य उपक्रम; 'अयिगिरी नंदिनी'च्या महाआरतीने वेधले लक्ष | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

लोकमान्यनगरमध्ये पारंपरिक भोंडला उत्सव उत्साहात; जेष्ठ नागरिक आणि हास्य योग संघाचा संयुक्त उपक्रम!

पुणे/सांगवी प्रतिनिधी सुनील पोकरे, दि. १६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे: लोकमान्य जेष्ठ नागरिक संघ आणि लोकमान्य हास्य योग संघ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्यनगर येथील जॉगिंग पार्क येथे नवरात्राच्या चौथ्या माळेनिमित्त पारंपरिक ‘भोंडला उत्सव’ अत्यंत भक्तिमय व प्रसन्न वातावरणात संपन्न झाला. सुमारे ७० हून अधिक महिलांनी पारंपरिक वेशभूषेत एकत्र येत या उत्सवाचा नितांत आनंद लुटला.
लोकमान्यनगर येथे गेल्या २८ वर्षांपासून लोकमान्य हास्ययोग संघ, प्रातःशाखा आणि प्राणायाम-योगासन वर्ग सातत्याने कार्यरत आहेत. दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करावी, या हास्ययोग संघाचे अध्यक्ष बंडोपंत फडके यांनी ठेवलेल्या प्रस्तावाला प्रतिसाद देत या संयुक्त सांस्कृतिक सोहळ्याचे नेटके आयोजन करण्यात आले होते.

नवरात्राच्या चौथ्या माळेच्या रंगाचे औचित्य साधून सर्व भगिनी निळ्या रंगाच्या साड्यांमध्ये सजल्या होत्या, तर बंधूवर्गानेही निळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. यामुळे कार्यक्रमात एक वेगळाच उत्साह आणि भव्यता दिसून आली.
कार्यक्रमाची सुरुवात देवीच्या षोडशोपचार पूजनाने झाली. बंडोपंत फडके सपत्नीक, तसेच हास्ययोग संघाच्या शाखाप्रमुख स्मिता ब्रह्मे आणि शाखा उपप्रमुख किशोरी आफळे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. नेहमीच्या पारंपरिक आरतीऐवजी ओघवत्या ‘अयिगिरी नंदिनी’ स्तोत्राची महाआरती आणि श्रीसूक्त पठण करण्यात आले. सर्व उपस्थितांना यामध्ये सहभागी होता यावे, यासाठी या स्तोत्रांच्या प्रतींचे वाटप संगीता भिल्लारे व प्रभा भालेराव यांनी केले.

आरतीनंतर जॉगिंग पार्कच्या हिरवळीवर दोन सुंदर सजवलेले हत्ती मध्यभागी ठेवून भोंडल्याचा खेळ रंगला. आतल्या गोलात बंधूवर्गाने, तर बाहेरील गोलात भगिनीवर्गाने फेर धरला.
प्रभा भालेराव, मनीषा डोंगरे, जयश्री लेले, वैशाली फडके, पुष्पा भगत आणि कमल कुलकर्णी यांच्यासह अनेक महिलांनी भोंडल्याची पारंपरिक व गाजलेली गाणी सादर करत वातावरण भक्तिमय करून सोडले. भोंडल्यानंतर उपस्थितांना संघातर्फे तसेच वैयक्तिक स्वरूपात विविध प्रकारच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.
हा आनंदसोहळा यशस्वी करण्यासाठी स्मिता ब्रह्मे, किशोरी आफळे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!