news
Home पिंपरी चिंचवड ‘शवविच्छेदन विभागातील गैरप्रकारावर महापालिका आयुक्तांचा चाबूक; डॉक्टर निलंबित, इतरांवरही चौकशीचे आदेश!’

‘शवविच्छेदन विभागातील गैरप्रकारावर महापालिका आयुक्तांचा चाबूक; डॉक्टर निलंबित, इतरांवरही चौकशीचे आदेश!’

'मॅक्स मंथन डेली न्यूज'च्या वास्तववादी वृत्तांकनानंतर उसळली होती संतापाची लाट; मारुती भापकरांच्या आंदोलनाला मोठे यश | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा दणका! वायसीएम रुग्णालयातील मद्यपार्टी प्रकरणी डॉ. वैभव म्हस्के अखेर निलंबित; मारुती भापकरांच्या पाठपुराव्याला यश!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील (YCM Hospital) अतिसंवेदनशील शवविच्छेदन (Post-Mortem) विभागात वैद्यकीय अधिकाऱ्याने मद्यपार्टी केल्याचा संतापजनक प्रकार चव्हाट्यावर आणणाऱ्या ‘मॅक्स मंथन डेली न्यूज’च्या बातमीचा जोरदार दणका बसला आहे. या घटनेची तातडीने दखल घेत महापालिका प्रशासनाने संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांना सेवेतून तत्काळ निलंबित केले आहे.
या निंदनीय प्रकाराविरोधात आक्रमक भूमिका घेत महापालिका आयुक्तांकडे चौकशी व बडतर्फीची आग्रही मागणी करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक मारुती साहेबराव भापकर यांच्या सनदशीर पाठपुराव्याला यामुळे मोठे यश मिळाले आहे.

मृत्यूचा दाखला (Death Certificate) घेण्यासाठी गेलेल्या नागरिकाला तासन्‌तास थांबवून ठेवल्यानंतर शवविच्छेदन विभागाच्या आत टेबलवर दारूच्या बाटल्या, भरलेले पेग, चकना आणि जेवणाची ताटे पाहायला मिळाली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के मद्यधुंद अवस्थेत आढळल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ‘मॅक्स मंथन डेली न्यूज’ने या धक्कादायक प्रकारावर प्रकाश टाकत रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
बातमी प्रसिद्ध होताच पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका आणि रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली होती.

या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी तातडीने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देऊन या गैरप्रकारात सहभागी असलेल्या सर्वांची सखोल चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली होती. “शवविच्छेदन विभागासारख्या पवित्र आणि गंभीर ठिकाणी सुरू असलेली ही विटंबना खपवून घेतली जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला होता.
प्रकरणाचे गांभीर्य आणि पुराव्यांची सत्यता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने डॉ. वैभव म्हस्के यांच्यावर निलंबनाची (Suspension) कठोर कारवाई केली आहे. तसेच या पार्टीत सामील असलेल्या इतर कर्मचाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावरही कडक विभागीय कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणाला आणि अधिकाऱ्यांच्या धिंगाण्याला आळा घालण्यासाठी ‘मॅक्स मंथन डेली न्यूज’ने मांडलेली रोखठोक भूमिका आणि मारुती भापकर यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा यामुळेच ही धडक कारवाई शक्य झाल्याची भावना पिंपरी-चिंचवडकर नागरिकांनी व्यक्त केली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!