77

शिवाजी बहुउद्देशीय उच्च माध्यमिक शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात; “व्यसन करायचेच असेल, तर पुस्तक वाचनाचे करा!” — प्रफुल्ल मंदा श्रीधर यांचे प्रतिपादन
अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. १५ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: “वाचन माणसाला ज्ञान देते, विचारांना दिशा देते आणि जीवनाला नवी दृष्टी प्रदान करते. पुस्तकांशी मैत्री करणारा विद्यार्थीच ज्ञानसमृद्ध, विवेकशील आणि जबाबदार नागरिक बनू शकतो,” असा प्रेरणादायी संदेश देत श्री शिवाजी बहुउद्देशीय उच्च माध्यमिक शाळा, शिवाजीनगर, अमरावती येथे भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात वाचन संस्कृती रुजविण्यासोबतच व्यसनमुक्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
कार्याक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रसाद देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून महिला राजसत्ता आंदोलनाचे कार्यकर्ते, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य अमरावतीचे जिल्हासंघटक आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर उपस्थित होते. तसेच विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती डिके मॅडम यांचीही व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे प्रेरणास्थान डॉ. पंजाबराव ऊर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्याचे पूजन व हारार्पण करून करण्यात आली. त्यानंतर महान वैज्ञानिक तथा भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.
विद्यालयात आयोजित वाचन सप्ताहाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी आपण वाचलेल्या पुस्तकांतील आवडते प्रसंग सांगितले आणि त्यातून मिळालेली शिकवण व स्वतःचे विचार प्रभावीपणे व्यक्त केले. सामूहिक वाचन उपक्रमासोबतच विद्यार्थ्यांनी वाचन संकल्पही केला.
या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी विद्यार्थी व तरुणांशी संवाद साधताना वाचन आणि व्यसनमुक्ती यांचा अत्यंत प्रभावी संबंध मांडला. ते म्हणाले,
“व्यसन करायचेच असेल, तर पुस्तक वाचनाचे करा! कारण पुस्तकांचे व्यसन माणसाला अधोगतीकडे नव्हे, तर ज्ञानाच्या आणि प्रगतीच्या दिशेने घेऊन जाते.”
विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहून नियमित वाचनाची सवय अंगीकारली पाहिजे, असे सांगत त्यांनी वाचनामुळे केवळ परीक्षेतील यशच नव्हे तर जीवन पाहण्याचा दृष्टिकोन समृद्ध होतो, असे स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या पंचसूत्रीची माहिती देत वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकनिष्ठ विचार आणि अंधश्रद्धांविरोधातील जनजागृतीचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांसमोर विशद केले.
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करत जनजागृतीपर पत्रकांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थिदशेत चांगल्या सवयी, सकारात्मक विचार आणि आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारल्यास भविष्यातील अनेक संकटांना सहज प्रतिबंध करता येतो, असा मोलाचा संदेश यावेळी देण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक प्रसाद देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि ती सत्यात उतरवण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचे आवाहन केले. डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनप्रवासातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी जिद्द, शिस्त, ज्ञान आणि मेहनतीच्या जोरावर आपले ध्येय साध्य करावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. सुवर्णा ठाकरे यांनी केले, तर सूत्रसंचालन श्रीमती कल्पना टाले यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. सुहासिनी भारसाकळे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. या सोहळ्यात विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुस्तकांचे वाचन, विचारांचा विवेक आणि व्यसनांसंदर्भातील जनजागृती या त्रिसूत्रीद्वारे एक सक्षम, सुजाण आणि प्रगत पिढी घडविण्याचा संदेश देणारा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


