37

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजारांचे अग्रिम अर्थसाहाय्य जाहीर केल्याबद्दल भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: महाराष्ट्रावर दाटलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. राज्यातील ३०५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपयांचे अग्रिम अर्थसाहाय्य जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संवेदनशील निर्णयाबद्दल पिंपरी-चिंचवड भाजपचे शहरध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर अभिनंदन केले आहे.
शत्रुघ्न काटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही दशकांत अनुभवला नाही असा भीषण दुष्काळ असताना राज्य सरकारने पाणी, पीक आणि चारा नियोजनासोबतच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारी पावले उचलली आहेत. या निर्णयामुळे राज्यातील साडेतीन लाख कुटुंबांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे.
दुष्काळाच्या या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांकडे सक्तीने कर्जवसुली करणाऱ्या यंत्रणांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत तंबी दिली आहे. तसेच दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले असून, जनावरांसाठी चारा देणाऱ्या पिकांचे नियोजन आणि हमीभावाने चारा खरेदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे.
दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती असताना यावर राजकारण करणे दुर्दैवी आहे, अशी खंत व्यक्त करत शत्रुघ्न काटे म्हणाले की, फडणवीस सरकारने ५ हजार रुपयांची अग्रिम मदत जाहीर केली असताना, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांची केवळ अडीच हजार रुपयांच्या मदतीची घोषणा करून बोळवण केली आहे. महाराष्ट्र सरकारची मदत कर्नाटकाच्या तुलनेत दुप्पट असून, कर्नाटक सरकार अजूनही केंद्राच्या मदतीची वाट पाहत आहे.
पीएम किसान सन्मान योजना, नमो शेतकरी योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि कृषी पंपांना मोफत वीजपुरवठा यांसारख्या योजनांद्वारे महायुती सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहे.
“राजकारण सोडून दुष्काळमुक्तीच्या संकल्पाला साथ द्या!”“पीएम किसान सन्मान योजना, नमो शेतकरी योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि दिवाळीपूर्वी ५ हजारांची थेट अग्रिम मदत देऊन देवेंद्रजींनी शेतकऱ्यांना दुष्काळात मोठा दिलासा दिला आहे. हा केवळ तात्पुरता दिलासा नसून महाराष्ट्राला कायमचे दुष्काळमुक्त करण्याचा हा संकल्प आहे. अशा गंभीर परिस्थितीत विरोधकांनी निरर्थक राजकारण न करता बळीराजाच्या हितासाठी सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.”— शत्रुघ्न (बापू) काटे, भाजप शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवड.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
