140

वायसीएमच्या शवविच्छेदन विभागात दारू पार्टी; संतापजनक प्रकरण उघडकीस!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातून (YCM Hospital) एक अत्यंत संतापजनक आणि मानवी संवेदनांना मलीन करणारा प्रकार समोर आला आहे. ज्या अतिसंवेदनशील शवविच्छेदन (Post-Mortem) विभागात मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाते, त्याच पवित्र व संवेदनशील ठिकाणी चक्क दारू पार्टी झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात मृत्यूनंतर मृत्यूचा दाखला (Death Certificate) मिळवण्यासाठी एक नागरिक आले होते. मात्र, तासन्तास प्रतीक्षा करूनही त्यांना दाखला मिळाला नाही. कोणत्या कारणामुळे उशीर होत आहे, हे पाहण्यासाठी संबंधित नागरिक जेव्हा शवविच्छेदन विभागाच्या आत गेले, तेव्हा त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला.
आतमध्ये टेबलवर दारूची बाटली, भरलेले पेग, चकना आणि जेवणाची ताटे स्पष्टपणे दिसत होती. शवविच्छेदन विभागासारख्या अत्यंत गंभीर आणि पवित्र ठिकाणी सुरू असलेला हा गैरप्रकार पाहून नागरिकाने त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसणारी एक व्यक्ती कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी वैभव म्हस्के असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तर त्यांच्यासोबत असलेली दुसरी व्यक्ती कोण, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या प्रकरणी संबंधित व्यक्तींची ओळख आणि त्यांच्यावर मद्यसेवनाचे केलेले आरोप अधिकृत यंत्रणेमार्फत तपासून कारवाई करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
एकीकडे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना व नातेवाईकांना विविध कागदपत्रांसाठी तासन्तास ताटकळत ठेवावे लागत असताना, दुसरीकडे जबाबदार अधिकारी अशा प्रकारे मद्यपान करून धिंगाणा घालायला मोकळे असतात का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
शवविच्छेदन विभागासारख्या ठिकाणी झालेला हा प्रकार अतिशय निंदनीय असून, वायसीएम रुग्णालय प्रशासन आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन या प्रकरणी नेमकी काय कठोर भूमिका घेते आणि दोषींवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागून आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
