news
Home पिंपरी चिंचवड ‘शहराच्या विकासासाठी मालमत्ता कर वसुली अत्यंत महत्त्वाची’; महापालिकेकडून दर पंधरा दिवसांनी आढावा घेण्याचा निर्णय!

‘शहराच्या विकासासाठी मालमत्ता कर वसुली अत्यंत महत्त्वाची’; महापालिकेकडून दर पंधरा दिवसांनी आढावा घेण्याचा निर्णय!

उपायुक्त सचिन पवार यांच्यासह सर्व मंडल अधिकारी उपस्थित; नवीन मालमत्ता सर्वेक्षण व प्रलंबित तक्रारी निकाली काढण्याचे आदेश | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा; दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा — अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीचे काटेकोर व प्रभावी नियोजन करण्याच्या आयुक्तांच्या सूचनांनुसार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने कर वसुलीची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली करसंकलन व कर आकारणी विभागाची उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत मालमत्ता कराची थकबाकी, जप्तीची कारवाई, मालमत्ता हस्तांतरण प्रकरणे, ‘सारथी’ पोर्टलवरील प्रलंबित तक्रारी तसेच मागील बैठकीतील निर्देशानुसार झालेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीत मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर म्हणाल्या की, “महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात (बजेट) मालमत्ता कराच्या उत्पन्नाचा मोठा वाटा असतो. या उत्पन्नावरच शहरात विविध विकासकामे आणि नागरिकांसाठी आवश्यक नागरी सुविधांचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. त्यामुळे चालू आर्थिक वर्षासाठी निश्चित केलेले करवसुलीचे उद्दिष्ट प्रत्येक अधिकाऱ्याने नियोजनबद्धरीत्या वेळेत पूर्ण करणे बंधनकारक आहे.”
करवसुलीच्या कामात कसूर किंवा दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दमही त्यांनी दिला. तसेच प्रत्येक मंडल अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीचा सखोल अभ्यास करून वसुली वाढविण्यासाठी प्रभावी उपाययोजनांचे नियोजन करावे आणि त्याचा लेखी अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

 ज्या मालमत्तांकडून थकीत कर लवकर वसूल होऊ शकतो, अशांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करून वारंवार नोटिसा बजावाव्यात. तरीही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवर नियमानुसार थेट मालमत्ता जप्तीची कारवाई करावी. करवसुलीच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी आता दर पंधरा दिवसांनी नियमित आढावा बैठक घेतली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.  मागील वर्षांच्या तुलनेत यंदा करवसुलीत अपेक्षित वाढ होण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. नवीन मालमत्ता सर्वेक्षणांतर्गत कर आकारणीच्या प्रक्रियेत असलेल्या मालमत्तांची कागदपत्रे व माहिती तातडीने अद्ययावत करावी. निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक व मोकळ्या जमिनींची वर्गवारी अचूक ठेवावी. मालमत्ता कराशी संबंधित प्रलंबित तक्रारी आणि मालमत्ता हस्तांतरणाची प्रकरणे विहित मुदतीत निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले.

 

या महत्त्वाच्या बैठकीस कर संकलन व कर आकारणी विभागाचे उपायुक्त सचिन पवार, प्रशासन अधिकारी रश्मी देशपांडे यांच्यासह सर्व सहाय्यक मंडल अधिकारी बाळू लोंढे, हनुमंत सरवदे, मनोज शिंदे, अजित नखाते, रणजीत भोसले, जयंत मरळीकर, राजेश बांदल, रविंद्र शिंदे, राजेंद्र कुदळे, प्रसाद एच. एस., राकेश सौदे, अत्युल काळे, नाना सोनटके, एस. खुकाळे, निता राणे, डी. डी. गोरडे, हनुमंत मोरे, मिलिंद कांबळे तसेच विभागातील इतर कर्मचारी उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!