31

पिंपरी-चिंचवड पोलिसांची सायबर गुन्हेगारांवर मोठी कारवाई; बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे ८६ लाखांची फसवणूक करणाऱ्या ९ जणांवर ‘मकोका’!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सायबर गुन्हे करणाऱ्या संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. सन २०२६ मधील सायबर गुन्हेगारांवरील ही दुसरी ‘मकोका’ (मोक्का – MCOCA) कारवाई ठरली आहे. बनावट ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची ८६ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ९ जणांच्या टोळीवर हा कठोर कायदा लावण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासात हे आरोपी कंबोडिया येथील आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दिनांक १७ जुलै २०२६ रोजी सायबर पोलीस ठाण्यात एका ज्येष्ठ नागरिकाने फसवणुकीची फिर्याद दिली होती. बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे भरघोस परताव्याचे आमिष दाखवून त्यांची तब्बल ८६,००,०००/- रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. फिर्यादीची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली होती. सायबर पोलिसांनी तातडीने पावले उचलत तांत्रिक तपासाच्या आधारे २८ लाख रुपयांची रक्कम विविध बँक खात्यांमध्ये गोठवली असून, ती रक्कम फिर्यादीला परत करण्याचे आदेश न्यायालयातून प्राप्त केले आहेत.
या गुन्ह्याचा समांतर व सखोल तपास करत असताना पोलिसांनी पुणे, लातूर, अहिल्यानगर (अहमदनगर), नवी मुंबई आणि हैदराबाद (तेलंगणा) येथून खालील आरोपींना निष्पन्न करून अटक केली आहे. तेजस ज्ञानोबा लोखंडे (वय २४ वर्षे, रा. मरकळगाव, पुणे), अविनाश ज्ञानोबा बाकलिकर (वय २८ वर्षे, रा. लातूर), हर्षल दिलीप बोरा (वय ३४ वर्षे, रा. अहिल्यानगर), सोनू हरिश शर्मा (वय २१ वर्षे, रा. नवी मुंबई), ॲलेक उर्फ गौरव रमेश गाडगे (वय २४ वर्षे, रा. मुंबई), अखिल श्रीनिवासराव नेल्लूरी (वय २४ वर्षे, रा. हैदराबाद, तेलंगणा)
सदर आरोपींनी सोशल मीडियाचा वापर करून नागरिकांना खोट्या योजनांमध्ये गुंतवले आणि फसवणुकीची रक्कम युएसडीटी (USDT) सारख्या आभासी चलना (Crypto Currency) द्वारे परदेशात वर्ग करून देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण केला होता. या आरोपींवर यापूर्वी पुणे शहर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि गुजरातमध्येही अपहरण, खंडणी, दरोडा व फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आरोपींची वाढती गुन्हेगारी आणि संघटित स्वरूपाचे वर्तन पाहता, त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका – MCOCA) सन १९९९ चे कलम ३(१)(ii), ३(४) अन्वये कारवाई करण्याचे आदेश अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड यांनी पारित केले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त (सायबर व आर्थिक गुन्हे) रोहिणी बनकर करत आहेत.
पोलिसांच्या या धडक कारवाईत पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, आणि सहायक पोलीस आयुक्त रोहिणी बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, वैभव पाटील, पोउपनि सागर पोमण , रोहीत डोळस, प्रकाश कातकडे , मपोउपनि विद्या पाटील , सपोफौ दत्तात्रय मसने, महेंद्र जाधव , पोहवा दिपक भोसले, हेमंत खरात , विनायक म्हसकर , सुनिल यादव , पोशि अतुल लोखंडे , श्रीकांत कबुले , सोपान बोधवड , माधव आरोटे, नामदेव वाघमारे , स्वप्निल खनसे , किरण देवकर , अभिजित उकिरडे , विशाल निचित , पंकज धोटे , स्मिता पाटील , दिपाली चव्हाण ( सर्व सायबर पो. स्टे . ) सपोफौ सचिन चव्हाण , पोशि गोविंद नरळे पीसीबी , गुन्हे शाखा ) व सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
