63

महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मोत्सवानिमित्त अमरावतीत २८ व २९ नोव्हेंबर रोजी ‘महात्मा फुले विचार साहित्य संमेलन’!
अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. १८ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मोत्सव वर्षानिमित्त अमरावती येथे २८ व २९ नोव्हेंबर २०२६ दरम्यान ‘महात्मा फुले विचार साहित्य संमेलनाचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने हे संमेलन पार पडणार आहे.
जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद आणि श्री गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट, राधानगर, अमरावती यांच्यावतीने या ऐतिहासिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनासाठी महाराष्ट्र शासनाकडून विशेष अनुदान लाभणार आहे.
या ऐतिहासिक साहित्य संमेलनाला अमरावती शहरातील अनेक समविचारी आणि सामाजिक संस्थांचे मोठे सहकार्य लाभले आहे. यामध्ये मराठा सेवासंघ व त्याचे सर्व कक्ष, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळ, महात्मा फुले द्विशताब्दी जन्मोत्सव समिती, दि विदर्भ माळी शिक्षण संस्था, उपेक्षित समाज महासंघ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे गाडगेबाबा अध्यासन, कर्मयोगी गाडगेबाबा विचार मंच, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जनसाहित्य परिषद, आदिशक्ती बहुउद्देशीय संस्था, हितगुज ज्येष्ठ भगिनी मंडळ, मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय, क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन, सुजन मराठी साहित्य परिषद, मराठा फ्रेंड्स क्लब, विवेकानंद वाचनालय, शेतकरी संघ महाराष्ट्र, यावली शहीद भूमिपुत्र समाज सेवा समिती, आदिसंपदा, बांधिलकी प्रतिष्ठान आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य (अमरावती) यांसारख्या प्रमुख संस्थांचा समावेश आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात विविध आकर्षक व प्रगल्भ कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. दिमाखदार उद्घाटन समारंभ, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा, नवीन ग्रंथ व पुस्तकांचे प्रकाशन, समाज व साहित्याशी संबंधित तीन महत्त्वपूर्ण परिसंवाद, नवोदित व ख्यातनाम कवींचा सहभाग असलेली दोन कवीसंमेलने, कथाकथन कार्यक्रम, प्रेरणादायी समारोप समारंभ
संमेलनाची तयारी जोरात सुरू असून, हा सोहळा यशस्वी करण्यासाठी डॉ. सतीश तराळ, डॉ. दिलीप काळे, डॉ. काशिनाथ बऱ्हाटे, वसंतराव वंडलकर, श्रीधरराव डहाके, रामदासजी सदर, बाळासाहेब महल्ले, अनंतराव हगोने, प्रफुल्ल मंदा श्रीधर यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार व भावी पिढीला प्रेरणा देणारे हे संमेलन अमरावतीकरांसाठी एक वैचारिक पर्व ठरणार आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
