पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज): पिंपळे सौदागर येथील नाना काटे सोशल फाउंडेशन ड्रीम्झ स्केटिंग क्लबच्या स्केटर्सनी इंडोनेशियातील सेमारंग येथे झालेल्या ‘चॅम्प ऑफ चॅम्प २०२५’ आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेत स्पोर्ट्स एलपीयू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना या खेळाडूंनी ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ८ कांस्य पदके जिंकली. या स्पर्धेत विविध देशांतील ८९६ खेळाडूंनी भाग घेतला होता, ज्यात भारताच्या १५ खेळाडूंचा समावेश होता.
विशेष म्हणजे, या खेळाडूंची आता ऑगस्टमध्ये थायलंडमधील फुकेत येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पीड स्केटिंग स्पर्धा तसेच आईस स्केटिंग ट्रेनिंग कॅम्प आणि आईस स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड १ ते २ फेब्रुवारी २०२५ दरम्यान गोवा स्केटिंग फेस्टिव्हलमध्ये आयोजित चाचणी स्पर्धेतून करण्यात आली होती. या निवड चाचणीत राष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
इंडोनेशिया स्पर्धेत पदक विजेते भारतीय खेळाडू:
- दर्शन ललित लोढा (११ वर्षे) – रौप्य पदक
- रिधेश रवींद्र कुडचे (८ वर्षे) – १ सुवर्ण, २ कांस्य पदके
- श्रीअंश विश्वकर्मा (७ वर्षे) – १ सुवर्ण, २ कांस्य पदके
- आद्विक अभिजीत मनिखेडकर (६ वर्षे) – २ कांस्य पदके
- संग्राम सुरेश शेळके (१२ वर्षे) – १ सुवर्ण, १ कांस्य पदक
- मुकुला अमित इंगळे (९ वर्षे) – १ रौप्य, १ कांस्य पदक
- स्वप्नील संतोष सरवदे (१५ वर्षे) – १ रौप्य पदक
नाना काटे सोशल फाउंडेशन ड्रीम्झ स्केटिंग क्लबच्या या सातही खेळाडूंनी आपल्या कौशल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवली. प्रशिक्षकांनी त्यांना इंडोनेशियाच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले होते. या विजयात प्रशिक्षक वैभव बिळगी, राहुल बिळगी, वंदना बिळगी आणि इतर प्रशिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
मुंबई विमानतळावर या विजयी संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी स्पोर्ट्स एल यु पी संघटनेचे पदाधिकारी, खेळाडूंचे कुटुंबीय आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते. नाना काटे सोशल फाउंडेशन ड्रीम्झ स्केटिंग क्लबने खेळाडूंना आर्थिक आणि मानसिक पाठबळ पुरवले. खेळाडूंना पुढील वाटचालीस नाना काटे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.