पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज): कार्यतत्पर अधिकारी विठ्ठल जोशी यांचा निरोप समारंभ
आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून गौरव; महसूल विभागात बदली
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनातील कामकाज नेहमीच वेळेत पूर्ण करणारे कार्यतत्पर अधिकारी म्हणून उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी ओळख मिळवली. त्यांच्या निरोप समारंभात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी त्यांचे खास कौतुक केले. “विठ्ठल जोशी यांनी आपल्या कामातून इतरांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे,” असे सिंह म्हणाले.
प्रतिनियुक्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आलेले उपजिल्हाधिकारी विठ्ठल जोशी यांची आता त्यांच्या मूळ महसूल व वन विभागात बदली झाली आहे. महानगरपालिकेतील त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते विठ्ठल जोशी यांचा भक्ती-शक्ती समूह शिल्प, मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, मुख्य वित्त लेखा अधिकारी प्रवीण जैन, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, नगर विकास विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांच्यासह अनेक सह शहर अभियंता, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, क्षेत्रिय अधिकारी, मुख्य सुरक्षा अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह यांनी आपल्या भाषणात विठ्ठल जोशी यांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, “महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून काम करताना त्यांनी सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली. माझ्याकडून सोपवलेले सर्व प्रशासकीय काम त्यांनी वेळेत पूर्ण केले. त्यांचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. पीसीएमसी@५० आणि १०० दिवस कृती आराखडा, राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता अशा विविध उपक्रमांतर्गत त्यांनी उत्तम काम केले. त्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे प्रशासनाला अधिक गती मिळते.” आयुक्त सिंह यांनी विठ्ठल जोशी यांना त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
निरोप समारंभाला उत्तर देताना विठ्ठल जोशी म्हणाले, “पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी खूप खास होता. आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास, दिलेला आदर आणि त्यांची संवेदनशीलता मी कधीही विसरणार नाही. महानगरपालिकेत काम करताना सर्व अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, शहर अभियंता, सर्व विभागप्रमुख, माझ्याशी चांगले संबंध असणारे डॉक्टर्स, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष आणि प्रशासन विभागातील सर्व सहकाऱ्यांचे मी आभार मानतो.”
