पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज): पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय महामार्ग ४८ लगतचे सेवा रस्ते होणार विकसित
रस्त्याच्या कामाला गती देण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत बैठक
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतून जाणारा मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांचा विकास करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन, आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणांना समन्वयाने आणि गतीने काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
महानगरपालिका आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अधिकाऱ्यांची एक संयुक्त आढावा बैठक आयुक्त शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग ४८ लगतच्या सेवा रस्त्यांच्या विकासावर चर्चा करण्यात आली.
बैठकीला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उपायुक्त मनोज लोणकर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित आदी उपस्थित होते.
सेवा रस्त्यांच्या विकासाचा आराखडा
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ च्या बाजूचा सध्याचा रस्ता १२ मीटर रुंद आहे. आता या रस्त्याचा १२ मीटरने विस्तार करून तो एकूण २४ मीटर रुंद केला जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या प्रकल्पाचा अंतिम आराखडा तयार केला असून, तेच या रस्त्याचे विकसन करणार आहेत. या बैठकीत रस्त्याच्या कामाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
आयुक्त शेखर सिंह यांनी रस्त्याच्या कामात येणारे सर्व होर्डिंग्ज, अनधिकृत टपऱ्या आणि बांधकामे तातडीने हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, रस्त्याच्या कामात अडथळा ठरणार्या भूमिगत सेवा वाहिन्या टाकताना भविष्याचा विचार करून नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मलवाहिन्या, जलवाहिन्या, विद्युतवाहिन्या, जल:निसारण वाहिन्या आदी सर्व सेवांचा विचार करून रस्त्याचे विकसन करावे, असेही ते म्हणाले. सेवा रस्त्यांचे विकसन करताना विविध विभागांशी समन्वय साधून काम करावे आणि विहित वेळेत काम पूर्ण करावे, असेही त्यांनी सांगितले. यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आवश्यक ते सहकार्य करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
सेवा रस्त्यांमुळे वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होईल
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ च्या बाजूला असलेले सेवा रस्ते विकसित झाल्यानंतर या रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच, हे सेवा रस्ते मुख्य महामार्गावरील गर्दी कमी करण्यास आणि एकूणच वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत करतील.
