पिंपरी-चिंचवड (मॅक्स मंथन डेली न्यूज): चाकण येथे एका महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुलभा उबाळे आणि पुणे जिल्हा संपर्कप्रमुख गीतांजली ढोणे यांनी या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात (फास्टट्रॅक कोर्ट) चालवण्याची मागणी केली आहे. तसेच, एमआयडीसी भागातील महिला कामगारांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी उद्योगमंत्री आणि पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
घडलेल्या घटनेनुसार, चाकणमधील मेदनकरवाडी भागात १३ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कंपनीत कामावर निघालेल्या एका महिलेला अज्ञात व्यक्तीने अंधाराचा फायदा घेत रस्त्यावरून फरफटत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
या संदर्भात सुलभा उबाळे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत आणि सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख गीतांजली ढोणे आणि शहर प्रमुख सरिता साने उपस्थित होत्या. निवेदनात उबाळे यांनी म्हटले आहे की, पीडित महिला रात्रीच्या शिफ्टसाठी कंपनीत जात असताना तिच्यावर अत्याचार झाला. या घटनेमुळे एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

उबाळे आणि ढोणे यांनी मागणी केली आहे की, हा प्रश्न केवळ चाकण एमआयडीसीपुरता मर्यादित नसून, संपूर्ण पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे. कंपन्यांमध्ये रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी कंपनीतर्फे वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्था पुरवणे आवश्यक आहे. तसेच, रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, सुलभा उबाळे यांनी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पीडित महिलेची भेट घेतली आणि तिला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे आश्वासन दिले. या वेळी गीतांजली ढोणे आणि सरिता साने देखील उपस्थित होत्या. शिवसेनेने या प्रकरणी कठोर भूमिका घेतली असून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
