पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज): पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित ‘स्पर्धा परीक्षेसाठी नवी दिशा’ या विशेष व्याख्यानमालेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ॲड. सनी मानकोसकर यांच्या व्याख्यानाने या ज्ञानवर्धक मालिकेतील पहिल्या पुष्पाची गुंफण झाली.
मानकोसकर यांनी दिला तयारीचा कानमंत्र:
निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनात झालेल्या या कार्यक्रमात ॲड. सनी मानकोसकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशा प्रकारे करावी, याबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना, आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहोत, त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कोणत्या विषयांवर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. अभ्यासक्रमाचे पूर्ण वाचन आणि मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे यशासाठी आवश्यक आहे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंगनाथ नाईकडे यांनी केले, तर राजेंद्र आंभेरे यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथालय प्रमुख कल्पना भाऊसाहेब जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि प्रविण चाबुकस्वार यांनी आभार मानले. या वेळी ग्रंथपाल वैशाली थोरात यांचीही उपस्थिती होती.
व्याख्यानमालेचे वेळापत्रक आणि ठिकाण:
- १३ मे २०२५ – यमुनानगर स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका, निगडी
- १५ मे २०२५ – कृष्णाजी चिंचवडे स्पर्धा परीक्षा केंद्र, चिंचवडगाव
- १६ मे २०२५ – नेताजी सुभाषचंद्र बोस स्पर्धा परीक्षा केंद्र, कासारवाडी
- १९ मे २०२५ – भोसरी स्पर्धा परीक्षा केंद्र, भोसरी
- २० मे २०२५ – शहीद अशोक कामटे स्पर्धा परीक्षा केंद्र, सांगवी
- २१ मे २०२५ – राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ स्पर्धा परीक्षा केंद्र, रहाटणी
- २२ मे २०२५ – स्व. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्पर्धा परीक्षा केंद्र, संभाजीनगर
शहरातील विविध भागांतील स्पर्धा परीक्षा केंद्रांवर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हे मार्गदर्शन निश्चितच उपयुक्त ठरेल.
