पिंपरी-चिंचवडमध्ये बापू काटे ठरले ‘किंगमेकर’; महापौरपदाचा त्याग करत पक्षासाठी दाखवली निष्ठा, शब्द केला खरा!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड : “पिंपरी-चिंचवड महापालिकेचा महापौर भाजपाचाच असेल,” हा शब्द पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांनी दिला होता आणि आज महापौरपदासाठी रवी लांडगे व उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे अर्ज दाखल होताच तो शब्द सत्यात उतरला आहे. स्वतः महापौरपदासाठी प्रबळ दावेदार असूनही, पक्षादेश शिरसावंद्य मानून बापू काटे यांनी दाखवलेली त्यागाची भावना शहरात चर्चेचा विषय ठरली असून, ते खऱ्या अर्थाने भाजपचे ‘संकटमोचक’ आणि ‘किंगमेकर’ ठरले आहेत.
२०१७ पासून सलग जनसेवेत असणाऱ्या बापू काटे यांना अनेकदा महत्त्वाच्या पदांनी हुलकावणी दिली. विधानसभा निवडणुकीत संधी हुकल्यानंतरही त्यांनी कोणतीही नाराजी न बाळगता पक्षाने दिलेली शहराध्यक्षपदाची धुरा अत्यंत सक्षमपणे सांभाळली. अवघ्या आठ महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी शहर संघटन इतके मजबूत केले की, महापालिका निवडणुकीत २०१७ पेक्षाही १० हून अधिक जागा निवडून आणत भाजपला अभूतपूर्व यश मिळवून दिले. स्वतः पदाच्या शर्यतीत असतानाही पक्षहितासाठी त्यांनी घेतलेली माघार ही त्यांच्या ‘समर्पण’ वृत्तीचे दर्शन घडवते.
महापौर व उपमहापौरपदाचे अर्ज भरताना भाजपच्या दिग्गज नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. यावेळी आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, गटनेते प्रशांत शितोळे, आमदार उमाताई खापरे, अमित गोरखे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, ज्येष्ठ नगरसेविका अनुराधा गोरखे, राजू मिसाळ, अभिषेक बारणे, केशव घोळवे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. बापू काटे यांच्या नियोजनाखाली शहरात भाजपचा झेंडा पुन्हा एकदा डौलाने फडकला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठा क्षेत्रात सुरू असलेला विकासाचा वेग कायम राखण्यासाठी नवीन सभागृह कटिबद्ध असेल, असा विश्वास बापू काटे यांनी व्यक्त केला.
शत्रुघ्न (बापू) काटे यांची प्रतिक्रिया:
“मी महापौरपदासाठी इच्छुक होतो, मात्र संधी मिळाली नाही म्हणून मी अजिबात नाराज नाही. पक्षाने माझ्यावर शहराध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिली आहे. वैयक्तिक पदापेक्षा पक्ष आणि शहराचा विकास माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. समर्पण भावनेतून काम करणे हीच भाजपाची शिकवण आहे आणि ती मी अखेरपर्यंत पाळणार.”
बापू काटे यांनी दाखवलेल्या या मोठ्या मनामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, सत्तेच्या सारीपाटावर त्यांनी स्वतःला एक ‘निस्पृह नेतृत्व’ म्हणून सिद्ध केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
