छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्पात ९२ कोटींचा निविदा घोटाळा? नगरसेविका सुलभा उबाळे यांच्या गंभीर आरोपांनी पिंपरी-चिंचवड मनपा हादरली!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १० जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २, बोऱ्हाडेवाडी (मोशी) येथे सुरू असलेल्या आराध्य दैवत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य १०० फूट उंचीच्या पुतळा उभारणीच्या प्रकल्पात तब्बल ९२.७६ कोटी रुपयांचा महाघोटाळा आणि निविदांमध्ये ‘रिंग’ झाल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना नगरसेविका सौ. सुलभा रामभाऊ उबाळे यांनी केला आहे. विशिष्ट कंत्राटदाराला आणि ‘मे. क्रिएशन्स इंजिनिअर्स प्रा.लि.’ या सल्लागार कंपनीला अवाजवी आर्थिक लाभ पोहोचवण्यासाठी प्रशासनाने नियम धाब्यावर बसवले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या संदर्भात नगरसेविका सुलभा उबाळे यांनी थेट स्थायी समिती सभापती आणि महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली असून, हा संशयास्पद सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव तात्काळ फेटाळण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची तक्रार थेट राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडेही करण्यात आली असून, संपूर्ण मनपा वर्तुळात आणि प्रशासकीय पातळीवर यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नगरसेविका सुलभा उबाळे यांनी पुतळा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यापासून ते आतापर्यंत मंजूर झालेल्या अवाढव्य खर्चाचा सविस्तर पाढाच निवेदनात वाचला आहे
- टप्पा १ (चौथऱ्याचे काम): सुमारे १२.४७ कोटी रुपये (निविदा मंजूर)
- टप्पा २ (१०० फूट ब्रॉन्झ पुतळा): सुमारे ३२.८४ कोटी रुपये (निविदा मंजूर)
- टप्पा ३ (चौथऱ्याचे उर्वरित काम व सुशोभीकरण): सुमारे १५.११ कोटी रुपये (निविदा मंजूर)
- टप्पा ४ (स्थापत्य, विद्युत व आर्ट विषयक सुशोभीकरण): सुमारे ३२.३४ कोटी रुपये (निविदा मंजूर)
- एकूण खर्च: आत्तापर्यंत तब्बल ९२.७६ कोटी रुपयांच्या निविदा या भव्य प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आल्या आहेत.
सुलभा उबाळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, “या प्रकल्पाच्या टप्पा क्र. ४ च्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनागोंदी आणि अनियमितता झाली आहे. याबाबत मी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आणि स्थायी समितीच्या बैठकीत वारंवार आवाज उठवूनही प्रशासनाने त्याकडे सोयीस्कर कानाडोळा केला. या निविदांचे अंदाजपत्रक (Estimate) तयार करताना वापरण्यात आलेले ‘रेट ॲनॅलिसिस’ पूर्णपणे चुकीचे आणि फुगवलेले आहे. अनेक साहित्यांचे दर थेट बाजारभावापेक्षा कितीतरी पटीने अधिक दाखवून कंत्राटदाराचे खिसे भरण्याचे काम सुरू आहे. प्रत्यक्ष जागेवर ज्या कामांची काडीचीही गरज नाही, अशा अनावश्यक बाबी केवळ निविदेची रक्कम फुगवण्यासाठी समाविष्ट केल्या गेल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची त्रयस्थ संस्थेमार्फत (Third Party Audit) तातडीने चौकशी होणे गरजेचे आहे.”
“या भव्य प्रकल्पासाठी टप्पा १, २ आणि ३ अशा सर्व कामांसाठी प्रकल्प सल्लागार म्हणून ‘मे. क्रिएशन्स इंजिनिअर्स प्रा.लि.’ यांचीच नेमणूक करण्यात आली होती. आता टप्पा ४ च्या ३२ कोटींच्या कामासाठी देखील निविदा पश्चात कामे करण्यासाठी पुन्हा याच कंपनीला ०.९९% दराने काम देण्याचा घाट का घातला जात आहे? पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पॅनेलवर इतरही अनेक तज्ज्ञ व सक्षम सल्लागार कंपन्या असताना, केवळ मे. क्रिएशन्सवरच प्रशासनाची एवढी मेहरबानी का?”
“या प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे ९२.७६ कोटी रुपये आहे. यावर सल्लागाराला मिळणारी ०.९९% टक्के फी कोट्यवधींच्या घरात जाते. मागील तीन टप्प्यांच्या कामात या कंपनीने नेमके काय अलौकिक ‘तांत्रिक कौशल्य’ दाखवले, ज्याच्या जोरावर त्यांना चौथ्या टप्प्याचेही काम थेट बहाल केले जात आहे? यापूर्वी त्यांनी केलेल्या कामांचे तांत्रिक ऑडिट झाले आहे का?”
“टप्पा १, २ आणि ३ चे काम अद्याप पूर्णपणे समाधानकारक आणि विहित निकषांनुसार झाले आहे का? पुतळा उभारणीसारख्या अत्यंत संवेदनशील आणि ऐतिहासिक प्रकल्पात केवळ घाईघाईने कंत्राटे देऊन टक्केवारी लाटणे, ही करदात्या नागरिकांच्या पैशांची अथांग उधळपट्टी नाही का? प्रशासनाने मागील तीन टप्प्यांच्या देखरेखीचा अहवाल तातडीने जनतेसमोर जाहीर करावा.”
“हा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याऐवजी त्याला अनेकदा संशयास्पदरीत्या मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रकल्प सल्लागार म्हणून या कंपनीने नेमके काय नियोजन केले होते, की ज्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकला नाही? सल्लागाराच्या कामात एवढी मोठी कसूर असतानाही त्यांना पुन्हा नवीन टप्प्याचे काम देणे, हे प्रशासनाच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.”
“टप्पा ४ साठी ‘पोस्ट टेंडर ॲक्टिव्हिटी’ अंतर्गत नवीन पारदर्शक निविदा न काढता, थेट नामांकनावर (Nomination) म्हणजेच जुन्याच सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी स्थायी समितीसमोर विषय क्र. ३ का मांडला गेला? खुल्या स्पर्धेतून नवीन आणि तज्ज्ञ सल्लागार नेमल्यास महापालिकेचा खर्च आणि कामाचा दर्जा सुधारू शकला असता, हे उघड असतानाही प्रशासन डोळेझाक का करत आहे?”
सुलभा उबाळे यांनी थेट आरोप केला आहे की, “निविदा पूर्व कामांसाठी नियुक्त केलेल्या या सल्लागाराने अत्यंत भ्रष्ट हेतूने आणि राजकीय दबावाखाली चुकीच्या पद्धतीने अंदाजपत्रक व निविदा अटी-शर्ती तयार केल्या आहेत. प्रकल्पाचे प्री-टेंडर आणि पोस्ट-टेंडर अशा दोन्ही टप्प्यांचे काम एकाच सल्लागाराकडे असल्यास, त्यांनी आधी केलेला बेकायदेशीर व भ्रष्ट कारभार कायमचा दाबून टाकता येईल, या सुप्त उद्देशानेच ही नियुक्ती केली जात आहे. त्यामुळे स्थायी समितीने हा भ्रष्टाचाराला वाव देणारा विषय तात्काळ फेटाळून लावावा.”
या संपूर्ण प्रकरणाची तक्रार राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे करण्यात आली असून, त्यांनी या प्रकरणी तात्काळ सखोल चौकशी करून अधिकृत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशी अहवालाची एक प्रत आपल्याला तातडीने देण्यात यावी, अशी आग्रही मागणी नगरसेविका सुलभा उबाळे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
