news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी मनपाच्या बांधकाम विभागाविरुद्ध नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे आक्रमक! किवळे-रावेत भागातील ‘बिल्डर पॅटर्न’वर निवेदनातून कडाडून हल्ला

पिंपरी मनपाच्या बांधकाम विभागाविरुद्ध नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे आक्रमक! किवळे-रावेत भागातील ‘बिल्डर पॅटर्न’वर निवेदनातून कडाडून हल्ला

"ओढे, नाले बुजवणारे मोठे गृहप्रकल्प रोखा, अन्यथा पूर येईल"; आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे विशेष चौकशी समितीची आणि नवीन परवानग्या रोखण्याची आग्रही मागणी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

निसर्गाशी खेळणारा ‘बिल्डर पॅटर्न’ थांबवा! किवळे, रावेत, मामुर्डीतील नैसर्गिक नाले, ओढे बुजवणारे विकासक निशाण्यावर; नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे आक्रमक

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, ९ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ किवळे, रावेत, मामुर्डी आणि गुरुद्वारा परिसरात सध्या बिल्डर्स आणि भूमाफियांनी स्वतःच्या पैशांच्या स्वार्थासाठी निसर्गाचा अक्षरशः गळा आवळला आहे. येथील नैसर्गिक ओढे, नाले आणि नदीपात्र उघड्या डोळ्यांनी बुजवले जात असतानाही महापालिकेचा बांधकाम परवानगी विभाग मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून बसला आहे. जर हा निसर्गाशी चाललेला खेळ तातडीने थांबला नाही, तर संपूर्ण परिसर पाण्याखाली जाईल,” अशा अत्यंत प्रखर शब्दांत आक्रोश व्यक्त करत क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सन्माननीय सदस्य तथा प्रभाग १६ चे नगरसेवक धर्मपाल यशवंतराव तंतरपाळे यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे.

या संदर्भात नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांनी पिंपरी-चिंचवड मनपाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना अत्यंत आक्रमक आणि कायदेशीर इशारा देणारे विनंती निवेदन सादर केले असून, प्रभागातील नैसर्गिक नाले, ओढे व नद्यांचे अधिकृत सर्वेक्षण करून हद्द निश्चित होईपर्यंत सर्वच बांधकाम परवानगी तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.

नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांनी निवेदनात महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाच्या संशयास्पद आणि अत्यंत ढिसाळ कारभाराचे जाहीर वाभाडे काढले आहेत. ते म्हणाले, “किवळे, रावेत, मामुर्डी आणि गुरुद्वारा परिसरात वर्षानुवर्षांचे जुने नैसर्गिक नाले आणि ओढे अस्तित्वात आहेत. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे हे नैसर्गिक नाले नगररचना विभागाच्या (Town Planning) अधिकृत डीपी प्लॅनवर (Development Plan) दिसतच नाहीत!

सर्वात गंभीर बाब म्हणजे, जेव्हा बांधकाम परवानगी विभागाचे अधिकारी जागेची पाहणी किंवा प्रत्यक्ष बांधकामाची तपासणी करण्यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळावर जातात, तेव्हा त्यांना तिथल्या जमिनीवर स्पष्टपणे नैसर्गिक नाले आणि ओढे वाहत असल्याचे दिसून येते. असे असतानाही हे अधिकारी बांधकाम व्यावसायिकांना (बिल्डरांना) तिथे नाले न बुजवण्याच्या साध्या सूचना देखील देत नाहीत आणि मूळ जागेवर थेट अवाढव्य गृहप्रकल्प उभारण्याची परवानगी बहाल करतात. हा सर्व प्रकार संशयास्पद असून या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच निसर्गाची कत्तल सुरू आहे.”

निसर्गाच्या चालवलेल्या या खेळखंडोब्याचा थेट फटका प्रभागातील निष्पाप सामान्य नागरिकांना बसत आहे. “गेल्या वेळी जेव्हा अचानक अवकाळी पाऊस आला, तेव्हा या भागात जाणाऱ्या पावसाच्या पाण्याला वाहून जाण्यासाठी नैसर्गिक नालेच शिल्लक उरले नसल्याने संपूर्ण पावसाचे घाण पाणी स्थानिक नागरिकांच्या घरांमध्ये शिरले होते. शेकडो कुटुंबांचे संसार पाण्यात तरंगत होते. त्यावेळी लोकप्रतिनिधी आणि एक सामान्य नागरिक या नात्याने मी स्वतः मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पुराच्या पाण्यात उतरून लोकांचे संसार वाचवण्याचे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचे काम करत होतो. जर आजच हे थांबवले नाही, तर आगामी पावसाळ्यात पुण्याच्या महापुराची पुनरावृत्ती या भागात झाल्याशिवाय राहणार नाही,” असा संतप्त इशारा तंतरपाळे यांनी दिला आहे.

नगरसेवक तंतरपाळे यांनी आपल्या निवेदनात थेट मोठ्या प्रकल्पांवर आणि अतिक्रमणावर बोट ठेवले आहे. रावेत येथील जाधव घाट परिसराजवळ अत्यंत मोठ्या प्रमाणावर अवैध अतिक्रमणे थाटली गेली असून, थेट पवित्र पवना नदीचे पात्रच बुजवून तिथे जमिनी लाटण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.  साईनगर मामुर्डी येथील ‘गोदरेज प्रकल्प’ (Godrej Project) असेल किंवा इतर मोठे गृहप्रकल्प असतील, या सर्वांनी आपल्या हद्दीतील नैसर्गिक ओढे आणि नाले अक्षरशः माती टाकून बुजवले आहेत आणि त्यावर इमारतींचे बांधकाम सुरू केले आहे. हा संपूर्ण प्रभाग आज प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पूर्णपणे दुर्लक्षित आणि अन्यायाचा बळी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला.

१) तातडीने चौकशी कमिटीची स्थापना: प्रभाग १६ मधील किवळे, रावेत, मामुर्डी येथील सर्व ओढे, नाले आणि नदीपात्राचे सर्वेक्षण करण्यासाठी मनपाच्या वतीने तात्काळ एका विशेष आणि निष्पक्ष चौकशी कमिटीची स्थापना करण्यात यावी. २) नवीन बांधकाम परवानगी स्थगित करा: जोपर्यंत ही विशेष कमिटी संपूर्ण प्रभागाचा सविस्तर सर्व्हे करून नैसर्गिक जलस्रोतांची मूळ हद्द निश्चित करत नाही, तोपर्यंत या संपूर्ण प्रभागातील सर्व बांधकाम व्यावसायिकांना नवीन बांधकामाची कोणतीही परवानगी देऊ नये. ३) बुजवलेले नाले पुन्हा मोकळे करा: ज्या बिल्डरांनी स्वतःच्या फायद्यासाठी नैसर्गिक नाले माती टाकून बंद केले आहेत, त्यांच्यावर कडक गुन्हे दाखल करून ते नाले मूळ स्वरूपात पुन्हा सुरू करून घ्यावेत. ४) पवना नदीपात्रातील अतिक्रमण हटवा: रावेत जाधव घाट परिसरातील पवना नदीच्या पात्रा शेजारील सर्व अनधिकृत अतिक्रमणे आणि बांधकामे तात्काळ जमीनदोस्त करण्याचे आदेश द्यावेत. ५) दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई: नैसर्गिक नाले व ओढे उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून बिल्डरांच्या फायद्यासाठी परवानगी देणाऱ्या संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे. या नगरसेवक तंतरपाळे यांच्या ५ मुख्य मागण्या आहेत .

“बांधकाम परवानगीला आमचा कोणताही विरोध नाही, मात्र स्थानिक विकासक स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाचा बळी देत असतील तर ते सहन केले जाणार नाही. आयुक्त साहेबांनी माझ्या प्रभागातील या अत्यंत गंभीर समस्येची दखल घेऊन माझ्या गरीब नागरिकांना न्याय मिळवून द्यावा,” अशी आग्रही मागणी धर्मपाल तंतरपाळे यांनी केली आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!