30
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १० वर्षांनंतर पुन्हा रंगणार ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’; महापौर रवी लांडगे यांच्या पुढाकाराने सांस्कृतिक परंपरेला नवसंजीवनी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २१ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: औद्योगिक नगरी म्हणून जगभरात ख्याती असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची सांस्कृतिक ओळख अधिक दृढ करण्यासाठी आणि खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरू करण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे प्रथम नागरिक तथा महापौर रवी लांडगे यांनी अत्यंत कौतुकास्पद व ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आगामी गणेशोत्सवाचे औचित्य साधून दिनांक १८ ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात तीन दिवसीय ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
शहरात सुरुवातीच्या काळात महापालिकेतर्फे गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात असत. मात्र, गेल्या १० वर्षांपासून ही सांस्कृतिक परंपरा खंडित झाली होती. महापौर रवी लांडगे यांनी स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि शहरात पुन्हा एकदा सांस्कृतिक ऊर्जा निर्माण करण्यासाठी ही परंपरा पुनरुज्जीवित केली असून, यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना मोठी सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे.
पत्रकार परिषदेत महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी या महोत्सवाच्या नियोजनाची व भव्य स्वरूपाची सविस्तर माहिती दिली.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सर्व वयोगटांतील नागरिकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाट्यरसिकांसाठी लोकप्रिय व्यावसायिक मराठी नाटकांचे विशेष प्रयोग, तसेच नामवंत गायक-कलाकारांच्या सहभागातून भावगीत, नाट्यगीत, भक्तिगीत आणि हिंदी-मराठी गाण्यांची बहारदार संगीत मैफल. महाराष्ट्राची समृद्ध परंपरा दर्शवणारी लावणी, तरुणाईसाठी फ्युजन व रॉक बँड परफॉर्मन्स आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणारे राज्यस्तरीय कवी संमेलन. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पाककला स्पर्धा, फॅशन शो आणि लहान मुलांसाठी बालनाट्य व बाल एकांकिका स्पर्धा. महाराष्ट्राच्या शौर्यपरंपरेचे दर्शन घडवणारे लाठी-काठी, दांडपट्टा व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके. याशिवाय स्थानिक कलाकुसर, वस्तू आणि खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन देणारी ‘संस्कृती जत्रा’ व प्रदर्शन.
पिंपरी-चिंचवड शहराचा नावलौकिक वाढवणाऱ्या आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा महोत्सवादरम्यान विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये ‘कलारत्न’, ‘साहित्यरत्न’, ‘क्रीडारत्न’, ‘नृत्यरत्न’ आणि ‘संगीतरत्न’ या मानाच्या पुरस्कारांचा समावेश आहे. “पिंपरी-चिंचवड ही केवळ कारखान्यांची आणि उद्योगांची नगरी नसून तिला समृद्ध सांस्कृतिक व कलात्मक वारसा लाभला आहे. १० वर्षांपासून खंडित झालेली ही गणेशोत्सवातील सांस्कृतिक परंपरा पुन्हा सुरू करून सर्व पिढ्यांना व कलाकारांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असा विश्वास महापौर रवी लांडगे यांनी व्यक्त केला.
१० वर्षे बंद पडलेला हा भव्य महोत्सव पुन्हा सुरू करून स्थानिक कलाकारांना व नागरिकांना गणेशोत्सवात आनंदाची पर्वणी उपलब्ध करून दिल्याबद्दल शहरातील कलाप्रेमी आणि नागरिकांमधून महापौर रवी लांडगे यांच्या दूरदृष्टीचे व नेतृत्वाचे जोरदार स्वागत होत आहे. नागरिकांनी, महिलांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबीयांसह या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. कालावधी: १८ ते २० सप्टेंबर २०२६, स्थळ: प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड, आयोजक: पिंपरी-चिंचवड महोत्सव समिती, स्पर्धा नावनोंदणीसाठी संपर्क: मनोज डाळीम्बकर (८२३७३३२२११), राजेंद्र बंग (९८२२३१३०६६)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
