20
शहर अभियंतापदी नियुक्तीबद्दल मनोज सेठिया यांचा महापालिका सभेत सत्कार!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २१ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: महानगरपालिकेच्या शहर अभियंतापदी मनोज सेठिया यांची नियुक्ती झाल्याबद्दल महापालिकेच्या महासभेत सर्वपक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मनोज सेठिया यांच्या आजवरच्या प्रशासकीय व अभियांत्रिकी सेवेचे विशेष कौतुक करण्यात आले असून, त्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
पिंपरी-चिंचवड हे वेगाने विकसित होणारे शहर असून, वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे, विकासकामांची गुणवत्ता कायम राखणे आणि विविध प्रलंबित प्रकल्पांना नियोजनबद्ध पद्धतीने गती देणे यात शहर अभियंता पदाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.
मनोज सेठिया यांच्या दांडग्या अनुभवाचा फायदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी होईल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दर्जेदार नागरी सुविधा निर्माण करणे आणि शहर विकासाचे नवे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांच्या कार्यकाळात सकारात्मक योगदान मिळेल, अशी अपेक्षा पदाधिकारी व नगरसदस्यांनी व्यक्त केली.
या सत्कार सोहळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर, सभागृह नेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, आर.पी.आय. गटनेते कुणाल वाव्हळकर, नगरसचिव अण्णा बोदडे यांच्यासह विविध समित्यांचे सभापती, नगरसदस्य आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
