10
काळेवाडीत मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात; मान्यवरांना ‘मराठवाडा भूषण’ पुरस्कार प्रदान!
पिंपरी प्रतिनिधी सुनील पोखरे, दि. २० सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी/काळेवाडी: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून ‘मराठवाडा जनविकास संघ (महाराष्ट्र राज्य)’ आणि ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम महोत्सव समिती, पिंपरी-चिंचवड’ यांच्या संयुक्त विद्यमाने काळेवाडी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना ‘मराठवाडा भूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी मराठवाड्याच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देतानाच आजच्या मराठवाड्यापुढील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सिंचन व रोजगाराच्या बिकट प्रश्नांवर गंभीर विचारमंथन करण्यात आले.
काळेवाडी येथे पार पडलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयाचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते पार पडले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विवेक मुंगळीकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अरुण पवार, शारदाताई मुंढे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, माजी व आजी लोकप्रतिनिधी गोपाळ माळेकर, सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, दत्तात्रय धोंडगे, नाना तांबारे, नरेंद्र माने, युवराज माने, प्रकाश इंगोले, बाळासाहेब साळुंखे, दिनेश पवार, महादेव स्वामी, किशोर अटगेकर, अंगद जाधव, भैरूजी मंडले, अनिता पांचाळ, कॅप्टन बालाजी पांचाळ, केशव बोधले, गोरख पाटील, सुग्रीव पाटील, लक्ष्मण जाधव, राधेश्याम शिंदे, संतोष भोरे, कृष्णा जाधवर यांच्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील मराठवाडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपले परखड विचार मांडताना धनाजीराव येळकर पाटील म्हणाले, “जुलमी निजामशाहीच्या जोखडातून मुक्त होऊन स्वतंत्र भारतात येऊन ७८ वर्षे झाली तरी मराठवाडा आजही उपेक्षित, मागास आणि तहानलेलाच आहे. सिंचनाचा अनुशेष न भरल्याने पाण्याची तीव्र टंचाई आहे. पाण्याअभावी उद्योगांना चालना मिळत नाही, ज्यामुळे दरडोई उत्पन्न कमी राहून रोजगारासाठी तरुणांना स्थलांतर करावे लागत आहे. स्थानिक पातळीवर शिक्षण व रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात राजकीय नेतृत्व अपयशी ठरले आहे.”
प्रास्ताविकात म्हणाले की, “मराठवाडा मुक्तिसंग्राम हा केवळ इतिहासातील एक अध्याय नसून स्वाभिमान व लोकशाही मूल्यांसाठी दिलेल्या संघर्षाची प्रेरणादायी गाथा आहे. या संघर्षातून प्रेरणा घेऊन आजच्या पिढीने मराठवाड्याच्या विकासासाठी पुढे आले पाहिजे.” – अरुण पवार (संस्थापक, मराठवाडा जनविकास संघ)
“शिक्षणानेच व्यापक समाज परिवर्तन घडू शकते. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगाराभिमुख शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे काळाची गरज आहे.” – डॉ. गणपतराव मोरे
“स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची जपणूक करून तो इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आपली जबाबदारी आहे. विकासासाठी शासन आणि समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे.” – भाऊसाहेब जाधव
“मराठवाड्यातील युवकांमध्ये अफाट क्षमता आहे. त्यांना योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते प्रत्येक क्षेत्रात देशात नाव लौकिक करू शकतात.” – डॉ. विवेक मुंगळीकर
सत्कारमूर्तींच्या वतीने उत्तर देताना त्यांनी, “योग्य कौशल्य आणि संधी मिळाल्यास उद्योग क्षेत्रातही मराठवाड्यातील तरुण नवी ओळख निर्माण करतील,” असा ठाम विश्वास व्यक्त केला. – विक्रम गायकवाड
विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना ‘मराठवाडा भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उद्योग क्षेत्र विक्रम गायकवाड (विक्रम डेव्हलपर्स) , सामाजिक क्षेत्र अर्चना देशमुख (स्नेहवन संस्था) , बांधकाम व विद्युत क्षेत्र दयानंद बळकटे (अभिषेक इलेक्ट्रिकल्स व कन्स्ट्रक्शन) , स्वातंत्र्य सेनानी सन्मान स्व. माधवराव शामराव माने, कृषी क्षेत्र भाई धनंजय उद्धवराव पाटील , कला क्षेत्र अक्षता सूर्यवंशी (बाल कलाकार).
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल क्षीरसागर यांनी केले, तर प्रकाश इंगोले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
