14
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ४४ वा वर्धापन दिन भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणार; सामाजिक, सांस्कृतिक अन् क्रीडा उपक्रमांची रेलचेल!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २० सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: महानगरपालिकेचा ४४ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि विविध सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच अधिकारी-कर्मचारी केंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या स्थापनेपासूनच्या विकासात्मक वाटचालीचा आढावा घेणे, शहराच्या प्रगतीत बहुमोलाचे योगदान देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करणे आणि नागरिकाभिमुख प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रमांची आखणी महापौर रवी लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
महानगरपालिकेचा वर्धापन दिन दरवर्षी ११ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. मात्र, यंदा ११ ऑक्टोबर रोजी रविवार व साप्ताहिक सुट्टी आल्याने मुख्य वर्धापन दिन सोहळा सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. हे सर्व कार्यक्रम पिंपरी येथील महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत आणि चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे पार पडणार आहेत.

वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीसाठी महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक पार पडली. या बैठकीला सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, कला, क्रीडा, सांस्कृतिक व पर्यटन समिती सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, प्रभाग अध्यक्ष निखील बोराडे, माजी नगरसेवक राजू मिसाळ, विकास साने, निलेश तरस, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, उपायुक्त पंकज पाटील, अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह शशिकांत झिंजुर्डे, उमेश बांदल, मंगेश कलापुरे, चंद्रशेखर गावडे, नितीन समगीर, लाला गाडे, विश्वनाथ लांडगे, राजाराम लांडे, मदन चिंचवडे, किशोर आठवाल, अनिल लखन आणि राकेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत संवाद साधताना महापौर रवी लांडगे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहराच्या गेल्या ४४ वर्षांच्या अभूतपूर्व विकासप्रवासात महानगरपालिकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. एक औद्योगिक नगरी ते आधुनिक स्मार्ट सिटी असा शहराचा प्रवास नागरिक, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सामूहिक सहभागातून साकार झाला आहे. आगामी काळात शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन अधिक सक्षम, पारदर्शक, गतिमान आणि गुणवत्तापूर्ण प्रशासन देण्यास आमचे प्राधान्य राहील. वर्धापन दिनानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा सत्कार करण्यासोबतच विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतून त्यांचा सहभाग वाढवला जाईल.”
नगरीचे शिल्पकार कै. अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात होईल. यासोबतच भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले जाणार आहे. महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी पाककला व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. तसेच संगीत खुर्ची, रस्सीखेच यांसारख्या क्रीडा स्पर्धा आणि कर्मचाऱ्यांचा विशेष ऑर्केस्ट्रा व फॅन्सी ड्रेस स्पर्धा रंगणार आहेत. महापालिकेच्या विविध विभागांत उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले जाईल.
वर्धापन दिन सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी जनसंपर्क, उद्यान, स्थापत्य, विद्युत, आरोग्य, सुरक्षा, अग्निशमन आणि वैद्यकीय विभागांवर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. शहरात ठिकठिकाणी व्हीएमडी (VMD) स्क्रीन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून महापालिकेचे प्रकल्प व वर्धापन दिनाचे संदेश प्रसारित केले जाणार आहेत. तसेच कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे पुस्तकांची प्रत देऊन स्वागत करण्याचे प्रस्तावित आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
