5
महापौरांच्या पुढाकारातून ‘सेवा संकल्पा’चा दिवा; स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या साक्षीने महापालिकेत जनसेवेचा संकल्प!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २० सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्या विशेष पुढाकारातून महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी बंधू-भगिनींसमवेत ‘संकल्पाचा दिवा’ प्रज्वलित करून अत्यंत भावूक व अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त करत पिंपरी-चिंचवड शहरात ‘सेवा संकल्प अभियान’ ही एक व्यापक लोकचळवळ म्हणून राबविण्याचा ठाम निर्धार करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मिळालेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हे देशसेवेचा संकल्प अधिक दृढ करणारे असल्याची भावना व्यक्त केली आहे. त्याच सेवाभावाला केंद्रस्थानी ठेवून महापौर रवी लांडगे यांनी शहर स्वच्छ, सुंदर, निरोगी आणि नागरिककेंद्री बनविण्यासाठी अहोरात्र श्रम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत हा ‘संकल्पाचा दिवा’ प्रज्वलित केला.
या प्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, महिला व बालकल्याण समिती सभापती राणीमाई पठारे, भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस मधुकर बच्चे यांच्यासह महानगरपालिकेचे विविध अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना महापौर रवी लांडगे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सेवा’ ही केवळ एक संकल्पना न ठेवता ती सार्वजनिक जीवनाच्या केंद्रस्थानी आणली आहे. विकासाभिमुख प्रशासन, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्याचा अंत्योदयाचा प्रयत्न आणि देशाच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत राहण्याची त्यांची भूमिका आम्हा सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा देण्यापेक्षा त्यांच्या या निष्काम सेवाभावातून प्रेरणा घेऊन आपल्या शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी एखादा सकारात्मक संकल्प करणे, हीच त्यांना खऱ्या अर्थाने दिलेल्या शुभेच्छा ठरतील.”
शहराच्या स्वच्छतेसाठी ऊन, पाऊस आणि कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता दररोज काम करणारे सफाई कर्मचारी हेच शहराच्या सेवाव्यवस्थेचा खरा पाठीचा कणा आहेत. त्यामुळे ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू करताना त्यांनाच केंद्रस्थानी ठेवून हा उपक्रम राबवण्यात आला. सफाई कर्मचाऱ्यांसोबत प्रज्वलित करण्यात आलेला ‘संकल्पाचा दिवा’ हा केवळ शुभेच्छांचे प्रतीक नसून स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि संवेदनशील जनसेवेसाठी संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराने एकत्र येण्याच्या सामूहिक निर्धाराचे प्रतीक असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
“महापौर म्हणून शहरातील प्रत्येक घटकाला विश्वासात घेऊन ‘सेवा परमो धर्मः’ या भावनेतून काम करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी, कर्मचारी आणि नागरिक या सर्वांच्या सक्रिय सहभागातून पिंपरी-चिंचवडमध्ये जनसेवेची एक नवी आणि समृद्ध संस्कृती निर्माण करायची आहे. ‘सेवा संकल्प अभियान’ केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता ते शहराच्या प्रत्येक प्रभागापर्यंत आणि नागरिकांपर्यंत पोहोचवले जाईल.”— रवी लांडगे (महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
या अभियानाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरातील स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण संरक्षण, नागरिक सहभाग आणि विविध नागरी सेवाविषयक उपक्रमांना अधिक सक्षम व व्यापक स्वरूप दिले जाणार आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

