12
तडीपारीचा आदेश मोडून शहरात शहरात दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार पिंपरी गुन्हे शाखेच्या जाळ्यात; दोन भल्यामोठ्या पालघन जप्त!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २० सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून पिंपरी-चिंचवड शहरात बेकायदेशीरपणे वावरणाऱ्या आणि घातक शस्त्रांसह दहशत माजवण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत तडीपार गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून दोन धारदार लोखंडी पालघन जप्त करण्यात आल्या आहेत.
गुन्हे शाखा युनिट-१ चे पथक हद्दीत तडीपार व फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी गस्त घालत असताना, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत भिसे यांना गुप्त बातमीदाराकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. तडीपार केलेला एक गुन्हेगार नेहरूनगर ते आंबेडकर चौकादरम्यानच्या सार्वजनिक रस्त्यावर शस्त्रांसह फिरत असल्याची बातमी मिळताच पथकाने अत्यंत शिताफीने सापळा रचला.
दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०:५० वाजण्याच्या सुमारास महात्मा फुले उद्यानाच्या भिंतीजवळ, आंबेडकर चौकाजवळ (पिंपरी) येथे संशयितरित्या वावरणाऱ्या या तडीपार आरोपीला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले.
आरोपीचे नाव प्रथमेश कुमार विटकर (वय २०, सध्या रा. भगवद्गीता मंदिरा जवळ, गांधीनगर, खराळवाडी, पिंपरी, पुणे. मूळ रा. मित्रमंडळाजवळ, कुसाळकर चौक, जनवाडी, पुणे). जप्त हत्यार ०२ धारदार लोखंडी पालघन.
आरोपीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४ (२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३), १३५ आणि १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कारवाई गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत भिसे, पोलीस हवालदार महादेव जावळे आणि शिवराम भोपे यांच्या पथकाने केली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
