54
बँक संप व आंदोलनांना तात्पुरती स्थगिती; आयबीए आणि युएफबीयू यांच्यात महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २८ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांच्यात रविवारी (दि. २७ सप्टेंबर २०२६) रात्री उशिरा पार पडलेल्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. या यशस्वी चर्चेनंतर बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेले प्रस्तावित संप आणि आंदोलन मागे घेत तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. युएफबीयूने परिपत्रक (Circular No. 2026/31) जारी करून या निर्णयाची अधिकृत माहिती सर्व घटकांना दिली आहे.
बँकेतील उर्वरित सर्व शनिवारी (All Saturdays) सुट्टी जाहीर करण्याच्या प्रमुख मागणीवर तोडगा काढण्यासाठी IBA आणि UFBU यांची एक उच्चस्तरीय समिती (High-level Committee) तातडीने स्थापन केली जाणार आहे. ही समिती विविध पर्यायांवर विचार करून, ग्राहक आणि सर्व भागधारकांसाठी (Stakeholders) फायदेशीर ठरेल असा सर्वमान्य तोडगा शोधणार आहे. स्केल ४ आणि त्यावरील अधिकाऱ्यांच्या ‘परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह’ (PLI) योजनेबाबत युनियन आणि असोसिएशनने मांडलेल्या हरकतींचा विचार करून या योजनेत आवश्यक सुधारणा सुचवणारा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यासाठी IBA सोबत चर्चा सुरू केली जाईल. ८ मार्च २०२४ रोजीच्या इतिवृत्तामध्ये (Minutes) नोंदवलेल्या सर्व उर्वरित प्रलंबित मुद्द्यांवर दोन्ही बाजूंचे प्रतिनिधी लवकरच सकारात्मक चर्चा करून त्वरित तोडगा काढतील.
IBA सोबत झालेल्या या महत्त्वपूर्ण कराराच्या पार्श्वभूमीवर युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) आपले आगामी आंदोलनात्मक कार्यक्रम आणि संप तात्पुरते स्थगित ठेवण्यास मान्यता दिली आहे.
या संयुक्त पत्रकावर AIBEA चे सरचिटणीस सी. एच. व्यंकटाचलम, AIBOC चे अनुपम रॉय, NCBE चे एल. चंद्रशेखर, AIBOA चे संजय खान, BEFI चे देबाशिष बसू चौधरी, INBEF चे ओ. पी. शर्मा आणि INBOC चे प्रेम मक्कर या प्रमुख कामगार नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
बँक कर्मचाऱ्यांच्या या निर्णयामुळे ऐन सण-उत्सवाच्या काळात देशभरातील व पिंपरी-चिंचवड शहरातील बँकिंग सेवा पूर्ववत सुरू राहणार असून, नागरिकांना व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
