7
बनावट घरफोडीचा बनाव उघडकीस; पत्नीनेच लपवले होते १३.९८ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ची यशस्वी कामगिरी!
पती दागिने विकून नवीन घर घेणार असल्याने पत्नीनेच रचला बनाव; अवघ्या १२ तासांत दिघी पोलीस ठाण्यातील गुन्ह्याचा उलगडा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २७ सप्टेंबर २०२६
पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने अत्यंत कौशल्याने आणि तपासाच्या चाणाक्ष बुद्धिमत्तेच्या जोरावर दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचा बनाव अवघ्या १२ तासांच्या आत उघडकीस आणला आहे. पती सोन्याचे दागिने विकून नवीन घर खरेदी करणार या भीतीपोटी पत्नीनेच १३ लाख ९८ हजार ९७८ रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने घरात लपवून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दिघी पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या घरफोडीच्या (गु.र.नं. ६२१/२०२६, BNS कलम ३३१(३), ३०५(+)) गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे आणि त्यांचे पथक करत होते.
तपासादरम्यान पोलीस पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील CCTV फुटेजची पाहणी केली आणि मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण केले. मात्र, संबंधित इमारतीत बाहेरील कोणतीही व्यक्ती आल्याचे किंवा गेल्याचे निष्पन्न झाले नाही. आसपासच्या रहिवाशांकडे चौकशी केली असता कोणताही पुरावा समोर येत नव्हता. यावरून संशय बळावल्याने व.पो.नि. संतोष कसबे आणि पोलीस हवालदार युवराज बिराजदार यांनी फिर्यादीच्या पत्नीला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली. घटनेचा सखोल अभ्यास, बारीक-सारीक तपशील आणि तार्किक विचारसरणीच्या आधारे पोलिसांनी संशयित बाबींचा अचूक अंदाज लावला. अखेर पोलिसी तपासापुढे फिर्यादीच्या पत्नीने सत्य कबूल केले.

फिर्यादीच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, तिचे पती घरातील सोन्या-चांदीचे सर्व दागिने विकून नवीन घर खरेदी करणार होते. हे मौल्यवान दागिने विकले जाऊ नयेत, या भीतीपोटी तिने ते घरातीलच एका गुप्त ठिकाणी लपवून ठेवले होते आणि घरफोडी झाल्याचा बनाव रचला होता. पोलिसांनी पंचांसमक्ष घरातील लपवलेले १३,९८,९७८ रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे सर्व दागिने जप्त करून गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, पोलीस सह-आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आव्हाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, भरत गोसावी, पोलीस अंमलदार युवराज बिराजदार, शशिकांत नांगरे, दिलीप राठोड, नितीन गुंजाळ, निखिल फापाळे आणि स्वप्निल महाले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वरे करत आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
