11
माथाडी संघटना बळकटीकरणासाठी चिंचवडमध्ये राज्यस्तरीय महामेळावा; २०३० पर्यंत ३० हजार पदाधिकारी जोडण्याचे उद्दिष्ट!
१४ जिल्ह्यांतील ६ हजारांहून अधिक माथाडी पदाधिकारी होणार सहभागी; मेळाव्यादरम्यान ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभा’चेही आयोजन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले दि. २७ सप्टेंबर २०२६
पिंपरी: भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियन (रजि.) च्या वतीने मंगळवारी (दि. २९ सप्टेंबर २०२६) चिंचवड येथील ‘ऑटो क्लस्टर’ येथे राज्यस्तरीय पदाधिकारी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्यातील १४ जिल्ह्यांमधील ६ हजारांहून अधिक माथाडी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनुप अविनाश मोरे यांनी रविवारी काळेवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मेळाव्याचे अधिकृत उद्घाटन मंगळवारी दुपारी २ वाजता मा. श्री. रवींद्र दादा चव्हाण यांच्या शुभहस्ते होणार आहे.

या मेळाव्यात माथाडी कामगारांचा रोजगार, सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा आणि सर्वांगीण कल्याणाशी संबंधित विविध प्रलंबित विषयांवर सखोल चर्चा केली जाणार आहे. संघटना अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखणे तसेच आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांवर विचारविनिमय केला जाईल. विशेषतः २०३० पर्यंत ३० हजार पदाधिकाऱ्यांना संघटनेशी जोडण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचे धोरणात्मक नियोजन यावेळी केले जाणार आहे. मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे बेरोजगार युवकांसाठी आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’ हा असणार आहे. पात्रता: ५ वी पासपासून ते उच्चशिक्षित उमेदवारांपर्यंत सर्व पात्र तरुणांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार संधी दिली जाईल. ऑन-द-स्पॉट नोकरी: पिंपरी-चिंचवड परिसरातील नामांकित उद्योग आणि कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची निवड करतील. जॉब कार्ड उपक्रम: मेळाव्यात तात्काळ नोकरी न मिळालेल्या उमेदवारांसाठी भविष्यातील संधींकरिता ‘जॉब कार्ड’ दिले जाणार आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे म्हणाल्या, “शत्रुघ्न उर्फ बापू काटे, अनुप मोरे आणि तुषार हिंगे या युवा नेतृत्वाने एकत्र येऊन कामगार आणि बेरोजगारांसाठी अतिशय स्तुत्य आणि सामाजिक उपक्रम आयोजित केला आहे, त्यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!”
भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहराची खरी ओळख उद्योगांची नगरी म्हणून आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून इयत्ता ५ वी ते पदवीधर असणाऱ्या प्रत्येक स्थानिक तरुणाच्या हाताला योग्य काम मिळावे, हाच आमचा मुख्य उद्देश आहे.”
या पत्रकार परिषदेला भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, माथाडी युनियनचे जिल्हाध्यक्ष अक्षय वरघडे, पिंपरी-चिंचवड सचिव ऋत्विक कुठे, प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे, प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, माजी नगरसेवक तुषार हिंगे, प्रदेश सरचिटणीस संतोष कांबळे, भाजप मंडल अध्यक्ष जयदीप खापरे, किशोर पन्हाळे, उपाध्यक्ष इम्रान पानसरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
