175
ज्येष्ठ नागरिक संघ सांगवी परिसराची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न; जुन्या गाण्यांची मेजवानी अन् वाढदिवसांचा उत्साह!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी सुनील पोकरे, दि. २८ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
सांगवी: ज्येष्ठ नागरिक संघ (सांगवी परिसर) संत सावतामाळी उद्यान येथे वर्ष २०२५-२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडली. सभेच्या सुरुवातीला संघाचे अध्यक्ष कमलाकर जाधव यांच्या हस्ते श्री गणेश प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या सभेला अध्यक्ष कमलाकर जाधव, उपाध्यक्ष रेखा गोरे, कार्याध्यक्ष विष्णू झाजुर्णे, सचिव सुरेंद्र शेळके, सहसचिव कल्पना देवगावकर, कोषाध्यक्ष शिवाजी बंडगर यांच्यासह परिसरातील ५० ते ६० ज्येष्ठ सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेचे प्रास्ताविक अध्यक्ष कमलाकर जाधव यांनी केले. तर कार्याध्यक्ष विष्णू झाजुर्णे यांनी मागील सभेच्या वृत्तांताचे वाचन केले. यानंतर सचिव सुरेंद्र शेळके यांनी वर्ष २०२५-२६ चे जमा-नावे पत्रक, उत्पन्न-खर्च पत्रक व ताळेबंद सभागृहात सादर केला, ज्यास उपस्थित सर्व सभासदांनी एकमुखाने मान्यता दिली.
कोषाध्यक्ष शिवाजी बंडगर यांनी सरकारी लेखापरीक्षणाची (ऑडिट) सविस्तर माहिती देऊन वर्ष २०२६-२७ चे संभाव्य अंदाजपत्रक मांडले, त्यासही सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यावेळी मागील वर्षभरात राबवण्यात आलेल्या विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.

सभेनंतर सप्टेंबर महिन्यात वाढदिवस असलेले ज्येष्ठ सभासद संजय जोशी, धनेश्वर फाकटकर, कल्पना देवगावकर, गोपाळ गाढवे, जाधव मॅडम, कानडे व नरेंद्र भावसार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
वाढदिवसाच्या औचित्याने ज्येष्ठ सभासदांनी सादर केलेल्या जुन्या हिंदी चित्रपटांतील गाण्यांनी सभेत विशेष रंग भरला. धनेश्वर फाकटकर यांनी १९७२ मधील ‘परिचय’ चित्रपटातील किशोर कुमार यांचे गाजलेले गीत ‘मुसाफिर हूँ यारों’ सादर केले. संजय जोशी यांनी १९६८ मधील ‘सरस्वतीचंद्र’ चित्रपटातील मुकेश यांच्या आवाजातील ‘चंदन सा बदन, चंचल चितवन’ हे सदाबहार गीत सादर केले. या दोन्ही गीतांना उपस्थित ज्येष्ठांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली.
संघात ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक वाढवणे आणि आगामी काळात अधिक प्रभावी व उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करणे यासंदर्भात संघाचे माजी अध्यक्ष रामचंद्र सपकाळ, ज्येष्ठ सभासद जयप्रकाश खोत व नांदनवार यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. सभेचे सूत्रसंचालन अध्यक्ष कमलाकर जाधव यांनी केले, तर उपाध्यक्ष रेखा गोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सभेची सांगता चहा व अल्पोपहाराने झाली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
