15
स्मार्ट इंडिया हॅकाथॉन आणि AI च्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर प्रभावी उपाय: आशिष पाटील
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २८ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात नवोपक्रम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा प्रभावी वापर करून समाजासमोरील विविध आव्हानात्मक समस्या अधिक कार्यक्षम आणि शाश्वत पद्धतीने सोडवता येऊ शकतात, असे प्रतिपादन ‘पर्सिस्टंट सिस्टीम्स’ कंपनीचे जागतिक कार्यक्रम व्यवस्थापक आशिष पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (PCCOER) येथे भारत सरकार शिक्षण मंत्रालय ‘इनोव्हेशन सेल’ अंतर्गत आयोजित ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२६-२७’ (Smart India Hackathon 2026-27) च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
देशभरातील विद्यार्थ्यांना विविध सामाजिक व औद्योगिक समस्यांवर तंत्रज्ञानावर आधारित उपाय शोधण्यासाठी प्रेरित करणाऱ्या या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या हॅकेथॉनमध्ये तब्बल ५९० हून अधिक विद्यार्थी संघांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी उत्कृष्ट कल्पना सादर करणाऱ्या ५० संघांची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली.
स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांच्या हस्ते पार पडले. आशिष पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, “विविध उद्योगांमध्ये AI चा वापर डेटा विश्लेषण, निर्णय प्रक्रिया, उत्पादन व्यवस्थापन, ग्राहक सेवा तसेच जटिल समस्यांचे जलद आणि अचूक निराकरण करण्यासाठी केला जात आहे.”
मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. हरीश तिवारी म्हणाले की, “आरोग्य, शिक्षण, शेती, पर्यावरण, वाहतूक, ग्रामीण विकास आणि सार्वजनिक सेवा यांसारख्या क्षेत्रांतील समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याचे काम विद्यार्थी करू शकतात. समस्या सोडवताना तिचे सखोल आकलन, योग्य डेटा संकलन आणि योग्य तंत्रज्ञानाची निवड करून प्रत्यक्ष उपयोगात येणारे उपाय विकसित करणे आवश्यक आहे.”
या हॅकेथॉनमध्ये उद्योग क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञांनी परीक्षक (Judges) म्हणून काम पाहिले. यामध्ये योगेश सहाणे (वरिष्ठ प्रणाली अभियंता, अनसन पुणे), श्रीकांत सावलकर (सहयोगी व्यवस्थापक, एक्सेंचर पुणे), शशांक बोरुडे (सह-संस्थापक, रेगेल ग्लोबल सिक्युरिटी कन्सल्टंट), स्वप्नील वडगावे (कार्यक्रम व्यवस्थापक, एपेक्सन पुणे), प्रतिक पवार (वरिष्ठ AI अभियंता, एपेक्सन पुणे), अभय राजपूत (सॉफ्टवेअर डेव्हलपर, एक्सेंचर पुणे), नोलेश वारके (डेटा सायन्स सल्लागार, डेलॉइट USI), अथर्व निंबाळकर (सॉफ्टवेअर अभियंता, पबमॅटिक पुणे), मुकेश तांदळे (सॉफ्टवेअर इंजिनिअर, डसॉल्ट सिस्टीम्स), प्रियांशु कुक्कर (वरिष्ठ माहिती सुरक्षा विश्लेषक, SAS R&D पुणे)
हा कार्यक्रम PCET चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या प्रसंगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अर्चना चौगुले, अधिष्ठाता डॉ. विजय कोतकर, समन्वयक प्रा. दीप्ती चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत प्रा. दीप्ती चौधरी यांनी केले, सूत्रसंचालन तृप्ती खेरडे यांनी तर आभार प्रा. दीपा महाजन यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
