news
Home अमरावती ‘मायबापहो… हाक गाडगेबाबांची’ अन् ‘अवघी विठाई माझी’ ग्रंथांच्या लेखकाचा नवी मुंबईत गौरव!

‘मायबापहो… हाक गाडगेबाबांची’ अन् ‘अवघी विठाई माझी’ ग्रंथांच्या लेखकाचा नवी मुंबईत गौरव!

रयत शिक्षण संस्थेत रंगला भव्य सोहळा; पुरस्कार सर्व सामाजिक, वैचारिक व वारकरी संत परंपरेला समर्पित | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

ज्येष्ठ लेखक व पत्रकार जयकुमार चर्जन ‘भारत गौरव श्री’ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित!

अमरावती/नवी मुंबई अविनाश वानखेडे, दि. २८ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती/नवी मुंबई: संत साहित्य, फुले-आंबेडकरी विचारधारेचा प्रचार आणि प्रागतिक विचारांच्या ग्रंथसंपदेचे लेखक तथा ज्येष्ठ पत्रकार श्री. जयकुमार चर्जन यांना नवी मुंबई येथे आयोजित भव्य सोहळ्यात राष्ट्रीय स्तरावरील ‘कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक भारत गौरव श्री पुरस्कार २०२६’ ने सन्मानित करण्यात आले. ‘कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबई’ च्या वतीने भारतीय पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिग्गजांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
नवी मुंबईतील कामोठे येथील रयत शिक्षण संस्था (रायगड विभाग) व्यवसाय इमारतीत रविवारी (दि. २७ सप्टेंबर २०२६) हा पुरस्कार सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला.

कोकण शिक्षक मतदारसंघाचे शिक्षक आमदार तथा रयत शिक्षण संस्था रायगड विभागाचे चेअरमन बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते श्री. जयकुमार चर्जन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी माजी प्राचार्य व दुग्ध व्यवसाय विभागाचे माजी उप-आयुक्त डॉ. रत्नाकर संपत अहिरे, विश्वविख्यात जादूगार व कॉर्पोरेट इल्युजनिस्ट सतीश देशमुख आणि ज्येष्ठ सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्रीमती आशा गोपाळ ज्ञाते यांच्यासह सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

एम.ए. (मराठी) आणि बी.एड. असलेले जयकुमार चर्जन यांनी तळेगाव मोहना (ता. चांदूर बाजार, जि. अमरावती) येथील ‘श्री संत गुणवंत बाबा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय’ येथून २५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर २०२० मध्ये निवृत्ती घेतली. लोकसत्ता, पुण्यनगरी, लोकशाही वार्ता आणि वाशीम संदेश आदी वृत्तपत्रांचे तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली आहे.
प्रकाशित साहित्य ‘पुंडलीक वरदा‘ (स्मृतीग्रंथ-२०२०), ‘मायबापहो… हाक गाडगेबाबांची’ (२०२३ – तिसऱ्या आवृत्तीकडे वाटचाल), ‘अवघी विठाई माझी‘ (संत सावता महाराज वैचारिक ग्रंथ-२०२४) आणि ‘गेले… ते दिन गेले‘ (ग्रामसंस्कृतीवर आधारित ललित ग्रंथ-२०२४). प्रकाशनाधीन साहित्य राष्ट्रपिता जोतीराव फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित ६०० पानांचा संशोधनात्मक ग्रंथ ‘डोळस महात्मा’, ‘प्रागतिक विचारांचे मानकरी’, ‘अवघा रंग एक झाला‘ (संत चोखामेळा), ‘खेड्या तुझ्या जिवावर‘ (काव्यसंग्रह) आणि ‘कॉम्रेड भगतसिंग’ हे ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. नाट्य व संगीत क्षेत्र ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील ‘ज्योतिबाची सावली… सावित्री माऊली‘ या नाटकात त्यांनी महात्मा फुलेंची मध्यवर्ती भूमिका साकारली असून या नाटकाचे महाराष्ट्र व मध्य प्रदेशात ५९ प्रयोग झाले आहेत.

 

“लोकशिक्षक संत गाडगेबाबा यांच्यावरील ‘मायबापहो… हाक गाडगेबाबांची’ आणि ‘स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात’ असा कर्मयोगाचा संदेश देणाऱ्या संत सावता महाराजांवरील ‘अवघी विठाई माझी’ या पुस्तकांच्या लेखनामुळेच मला हा सन्मान मिळाला आहे. हा पुरस्कार मी सर्व सामाजिक, वैचारिक व वारकरी संत परंपरेतील संतांना नम्रपणे समर्पित करतो,” अशी प्रतिक्रिया जयकुमार चर्जन यांनी व्यक्त केली.
सामाजिक व वैचारिक चळवळीत अहोरात्र कार्य करणाऱ्या चर्जन सरांचे पिंपरी-चिंचवड आणि अमरावतीतील साहित्यिक वर्तुळातून अभिनंदन होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!