16
गणेश विसर्जन घाटांवर महापालिकेकडून स्वच्छतेची तत्पर यंत्रणा; चार दिवसांत ६,५०० मेट्रिक टन कचरा संकलित!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २८ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील विसर्जन घाट तसेच मिरवणूक मार्गांवर स्वच्छता, कचरा संकलन आणि निर्माल्य विलगीकरणाची विशेष व प्रभावी यंत्रणा राबविण्यात आली. २२ ते २५ सप्टेंबर या चार दिवसांच्या कालावधीत शहरातून तब्बल ६,५०० मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला असून, ३ हजारांहून अधिक सफाई सेवकांनी मैदानावर उतरून तातडीने स्वच्छता मोहीम फत्ते केली.
गणेशमूर्तींना अर्पण करण्यात आलेली फुले, हार, दुर्वा तसेच पूजासाहित्यापासून निर्माण झालेले २९४.६५५ मेट्रिक टन निर्माल्य कचऱ्यात न मिसळता स्वतंत्रपणे संकलित करण्यात आले. यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्व विसर्जन घाटांवर विशेष निर्माल्य कुंड आणि विलगीकरणाची सुसज्ज व्यवस्था करण्यात आली होती.
विसर्जनाच्या दिवशी मोठी गर्दी असतानाही स्वच्छता सेवकांनी सातत्याने काम करून घाट परिसर आणि मिरवणूक मार्ग स्वच्छ व चकचकीत ठेवले. विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही आरोग्य कर्मचाऱ्यांनी तातडीने घाट परिसराची स्वच्छता करून परिसर पूर्ववत केला.
आरोग्य विभागाच्या कामगिरीविषयी बोलताना उप-आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, “गणेशोत्सव व विसर्जन काळात शहरातील स्वच्छता सुरळीत ठेवण्यासाठी आरोग्य विभागाची पथके अहोरात्र कार्यरत होती. नागरिकांनीही आपला कचरा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता त्याचे योग्य विलगीकरण करून महापालिकेच्या संकलन व्यवस्थेकडे द्यावे. शहराची स्वच्छता राखणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”
“गणेश विसर्जनाच्या काळात नागरिकांनी दाखवलेली स्वच्छतेबाबतची जागरूकता आणि दिलेले सहकार्य अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले. नागरिकांनी निर्माल्य स्वतंत्र जमा केल्याने विसर्जन घाट व मिरवणूक मार्गावरील स्वच्छता राखणे सोपे झाले. त्याचबरोबर अहोरात्र कार्यरत राहून अवघ्या चार दिवसांत ६५०० मेट्रिक टन कचरा हटवणाऱ्या सर्व ३ हजार सफाई सेवक व आरोग्य पथकांचे काम अत्यंत कौतुकास्पद आहे. नागरिक आणि महापालिका यंत्रणेच्या उत्तम समन्वयातून स्वच्छतेची ही व्यवस्था यशस्वी झाली,” असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

