46
महाराष्ट्र अंनिसची अमरावती जिल्हा बैठक संपन्न; चमत्कार प्रशिक्षणावर भर अन् चिखलदरा-धारणीत शाखा बांधणीचा निर्धार!
अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. २८ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महा. अंनिस) अमरावती जिल्हा शाखेची जिल्हा बैठक गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, राधानगर येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि विचारमंथनात्मक वातावरणात संपन्न झाली. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य अधिक प्रभावीपणे गावागावात पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांना ‘चमत्कार प्रशिक्षण’ देण्याचा आणि मेळघाटातील चिखलदरा व धारणी परिसरात संघटना बांधणीसाठी विशेष दौरा आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रमोद कोळमकर होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नरेंद्र धर्माळे व लक्ष्मण तडस उपस्थित होते.
तथाकथित चमत्कारांमागील वैज्ञानिक कारणे, हातचलाखीचे विविध प्रकार आणि भोंदूबाबांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या पद्धती समजून घेऊन ते सर्वसामान्य नागरिकांसमोर वैज्ञानिक पद्धतीने मांडण्यासाठी कार्यकर्त्यांना विशेष चमत्कार प्रशिक्षण दिले जाणार आहे.
याशिवाय, मेळघाटातील चिखलदरा व धारणी या भागात लवकरच शाखा बांधणी दौरा आयोजित करून अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी विचारांचा प्रसार अधिक तीव्र करण्याचा संकल्प करण्यात आला.

बैठकीत अंबाजोगाई येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीचा अहवाल मांडण्यात आला. जिल्हा प्रधान सचिव विजय डवरे यांनी जिल्हास्तरीय अहवाल सादर केला. तर सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी ‘महा. अंनिस’च्या मासिकाचे (अंकाचे) वर्गणीदार वाढवणे, मासिकाचा व्यापक प्रसार आणि संघटना बांधणीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी बडनेरा शाखेचा अहवाल बबिता वानखडे, दर्यापूरचा नरेंद्र धर्माळे, चांदूर रेल्वेचा पल्लवी ढोले, अमरावती शहर शाखेचा सचिन खोब्रागडे, चांदूर बाजार शाखेचा राहुल खंडारे, तर पुजदा शाखेचा अहवाल प्रतिभा खापरे यांनी मांडला.
आगामी काळात बुवाबाजीविरोधी संघर्ष परिषद, चमत्कार प्रशिक्षण, लेखन-वाचन कार्यशाळा, विवेकवादी जनजागृती अभियान यांसारखे उपक्रम राबवून ग्रामीण व शहरी भागात कार्यकर्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला.
सदर बैठकीचे सूत्रसंचालन अमरावती शहर शाखा प्रधान सचिव मंजू वासनिक यांनी केले, तर आभार संदीप हिवराळे यांनी मानले आणि समन्वय आशिष देशमुख यांनी साधला. या बैठकीला सचिन वासनिक, संजय खापरे, लक्ष्मण तडस यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्त्वाची टीप: पुढील जिल्हा बैठक आणि चमत्कार प्रशिक्षण रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. “अंधश्रद्धा हटवा – विवेक वाढवा” या भूमिकेसह बैठकीची सांगता झाली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
