26
‘ज्ञानेश कुमार हटवा, लोकशाही वाचवा!’; कष्टकरी संघर्ष महासंघाचे चिंचवड येथे एल्गार आंदोलन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २८ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार हे लोकशाही विरोधी काम करत असून त्यांच्या धोरणांमुळे देशातील लोकशाहीला मोठा धोका निर्माण झाला आहे. सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी आयोगात एकतर्फी निर्णय घेतले जात असल्याचा आरोप करत कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने चिंचवड येथे ‘निवडणूक आयोग वाचवा, लोकशाही वाचवा’ असे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनानंतर शिष्टमंडळाच्या वतीने पिंपरी चिंचवडचे तहसीलदार जयराज देशमुख यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सोपवण्यात आले.

आंदोलनादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले की, “निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत ज्ञानेश कुमार यांच्या विविध निर्णयांवर तब्बल १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले आहेत, यावरूनच आयोगाच्या मनमानी कारभाराची प्रचिती येते. निवडणूक आयोगाने ‘विशेष सखोल पुनरावृत्ती’ (SIR) च्या नावाखाली ‘ई-सिनेट’ सॉफ्टवेअरचा वापर करून पद्धतशीरपणे मतदारांची नावे वगळण्याचा सपाटा लावला आहे.”
त्यांनी पुढे माहिती दिली की, SIR च्या नावाखाली महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातून प्रत्येकी २ कोटी, पश्चिम बंगालमधून ९० लाख, तामिळनाडूतून ९७ लाख, कर्नाटकातून १ कोटी, तेलंगणातून ७३ लाख, दिल्लीतून ४७ लाख आणि केरळमधून २४ लाख अशा तब्बल १३ कोटींहून अधिक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील ३ विधानसभा मतदारसंघांमधून ६ लाख ८ हजार ९२७ मतदारांची नावे वगळली गेल्याने पात्र नागरिकांचा मतदानाचा घटनात्मक अधिकार हिरावला जात असल्याचे नखाते यांनी नमूद केले.

निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेचे संरक्षण, मतदार याद्यांमधील पारदर्शकता आणि सर्व पात्र नागरिकांना मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात महासंघाचे उपाध्यक्ष राजेश माने, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, मनपा सदस्य सलीम डांगे, निरंजन लोखंडे, लाला राठोड, बालाजी लोखंडे, इरफान चौधरी, यासीन शेख, सुनील भोसले, सहदेव होनमने, ओमप्रकाश मोरया, सागर ठोंबरे, संतोष खोडवे, देवप्पा मिटकरी, गीतांजली सोनवणे, अरुणा सोनवणे, सविता कांबळे, अनिता कुंभार यांच्यासह शेकडो नागरिक व कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
