34
एसबीपीसीओएडी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न; ज्येष्ठ वास्तुविशारद डॉ. महेश नामपूरकर यांचे मार्गदर्शन!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २९ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: आंतरराष्ट्रीय स्तरावर वास्तुविशारद (आर्किटेक्चर) क्षेत्रात मोठी स्पर्धा असली, तरी भारतात या क्षेत्रात नवनवीन संधींची मोठी कवाडे उघडी आहेत. जिथे कमतरता असते, तिथेच संधी निर्माण होते. याचा सकारात्मक उपयोग करून विद्यार्थ्यांनी जिद्दीच्या जोरावर आपले करिअर घडवावे, असे प्रेरक मार्गदर्शन ज्येष्ठ वास्तुविशारद व आंतरराष्ट्रीय लँडस्केप डिझायनर डॉ. महेश नामपूरकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन (एसबीपीसीओएडी) महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील ‘बॅचलर ऑफ आर्किटेक्ट’च्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या प्रसंगी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स (पुणे सेंटर) चे चेअरमन आर्किटेक्ट शितेश अग्रवाल, एसबीपीसीओएडीच्या प्राचार्या डॉ. स्मिता सूर्यवंशी, यशस्वी विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनात डॉ. नामपूरकर पुढे म्हणाले की, “वास्तुशास्त्र हा एक अतिशय सुंदर आणि सर्जनशील व्यवसाय आहे. हे क्षेत्र विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे काम करण्याचे सामर्थ्य आणि आत्मविश्वास देते. आपल्याला कुठे स्थायिक व्हायचे आहे याची निवड करण्याचे स्वातंत्र्य या क्षेत्रामुळे मिळते. तसेच हे क्षेत्र देशसेवा करण्याचे एक उत्तम माध्यम आहे.” कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विशेष माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सर्वोत्तम विद्यार्थी प्रेरणा चषक मध्ये माजी विद्यार्थिनी आर्किटेक्ट हरश्री नखरानी यांना सन २०२५ चा सर्वोत्तम विद्यार्थी प्रेरणा चषक देऊन गौरविण्यात आले. MPSC मध्ये असिस्टंट टाऊन प्लॅनरपदी निवड झाल्याबद्दल काजल थिटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. FOAID यंग वुमन अचीव्हर ऑफ द इयर (हॉस्पिटॅलिटी) मध्ये अंकिता पाटील , स्ट्राईड मेक स्पेस डिझाईन स्पर्धेत दिशा प्रधान आणि आदर्श प्रधान, ‘स्कार्स ऑफ इंडिया – द अनटोल्ड बॅटल्स’ या पुस्तकासाठी स्वरा मुसळे आणि ‘कलर्स ऑफ धर्म’ या कलरिंग बुकसाठी गार्गी साठे यांना सन्मानित करण्यात आले. पर्यावरण, शाश्वतता, वादविवाद, पोस्टर डिझाईन, बर्ड हाऊस डिझाईन आणि फोटोग्राफी स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल ओमकुमार बागले, जानवी भोसले, दिशा प्रधान, सिद्धी सावंत, भार्गवी पोहणे, आदित्य काळे, कृतिका चनी, प्रतिभा काकडे व सानिका काळे यांचा सत्कार झाला. कॅम्प फोटोग्राफी स्पर्धेत प्रथम – राधिका मंत्री, द्वितीय – सानिका सुतार, तृतीय – संदली मेंधळकर; तर विशेष सहभागाबद्दल मृदुल मारळ, मृण्मयी चौधरी व ऐश्वर्या जाधव यांचा गौरव करण्यात आला.
या सोहळ्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील एकूण ४३ गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या माजी विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या नूतन विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. यामध्ये अध्यक्ष अमोद भेगडे, उपाध्यक्ष मृण्मयी चौधरी, सचिव कुशा गोयल, सांस्कृतिक प्रमुख सायली केसकर, क्रीडा प्रमुख मृदुल मारळ यांच्यासह विविध क्लबच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अजय हरताळे, अंतर्गत वरिष्ठ पर्यवेक्षक ऋजुता पाठक, लक्ष्मण तोरगळे आणि किसन काळे यांनी विशेष परिश्रम घेतले. सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. शिवा शिशोविया व प्रा. दक्षा देशमुख यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्राचार्या डॉ. स्मिता सूर्यवंशी यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

