44
माथाडी कामगारांचे सक्षम नेतृत्व: युवा नेते अनुप मोरे यांच्या नेतृत्वाखाली चिंचवडमध्ये राज्यस्तरीय मेळावा संपन्न; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून कौतुक!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २९ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: आपल्या धडाडीच्या आणि अभ्यासू नेतृत्वाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे निर्माण करणारे युवा नेते अनुप मोरे यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड येथे ‘भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक, जनरल कामगार युनियन’ (रजि.) चा भव्य राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. अल्पावधीत १५ हजारांहून अधिक सदस्यांची नोंदणी करून कामगार क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या अनुप मोरे यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकतीने उभी राहील, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
कामगारांच्या हक्कासाठी अहोरात्र धावून जाणारे अनुप मोरे यांच्या या यशस्वी मेळाव्यामुळे महाराष्ट्रभरात आणि पक्ष संघटनेत त्यांच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मेळाव्यात मार्गदर्शन करताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, “पूर्वीच्या जुन्या कामगार कायद्यांमधील त्रुटींचा फायदा घेऊन कामगारांना अडचणीत आणले जात होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगार कायद्यांत क्रांतिकारी सुधारणा करून कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय दिला. आता ई-श्रम, पीएफ आणि आभा कार्डद्वारे संपूर्ण कुटुंबाला आरोग्य विम्याचे कवच मिळत आहे. या सरकारी योजनांचा लाभ तळागाळातील कामगारांपर्यंत पोहोचवण्याचे काम अनुप मोरे अत्यंत सक्षमपणे करत आहेत.”
ते पुढे म्हणाले, “अनुप मोरे यांच्या युनियनच्या लोगोमध्ये राष्ट्रमातेचा समावेश असून, ते ‘राष्ट्र प्रथम’ हीच भावना जपून काम करत आहेत. अल्पावधीत १५ हजार सदस्यांची नोंदणी करणे ही अनुप मोरे यांच्या संघटन कौशल्याची पोचपावती आहे. त्यांच्या ५० हजार सदस्य नोंदणीच्या ध्येयासाठी भाजपा पूर्ण ताकतीने सोबत असेल.”
मेळाव्याचे प्रास्ताविक आणि स्वागत करताना युनियनचे संस्थापक अध्यक्ष अनुप मोरे यांनी अत्यंत भावनिक व आक्रमक विचार मांडले. ते म्हणाले, “पक्षाच्या ध्येय-धोरणांनुसार २०१४ मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेने आज संपूर्ण महाराष्ट्रात १५ हजार सभासदांचा टप्पा पार केला आहे. २०२९ मध्ये राज्य आणि केंद्रात पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने भाजपचे सरकार आणण्यासाठी आमची माथाडी युनियन ५० हजार सभासद नोंदणीचे ध्येय पूर्ण करेल, असा शब्द मी प्रदेशाध्यक्षांना देतो.”
आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे आणि कामगारांच्या पाठिंब्याचा उल्लेख करत मोरे पुढे म्हणाले, “पक्षाने आणि वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर प्रदेश पातळीवर काम करण्याची जी जबाबदारी सोपवली आहे, त्याचे सोने करून कामगारांच्या अन्यायाविरुद्ध सातत्याने लढत राहीन. कामगारांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कधीही तुटू देणार नाही.”
या राज्यस्तरीय मेळाव्याप्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश दादा लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे, पक्षनेते प्रशांत शितोळे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, माजी उपमहापौर तुषार हिंगे, विजय हरगुडे, जयदीप खापरे, नगराध्यक्ष संतोष दाभाडे, अक्षय वरघडे, राकेश सणस, वसीम शेख यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले हजारो माथाडी कामगार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. विजय हरगुडे यांनी केले, सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी तर उपस्थितांचे आभार संतोष कांबळे यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


