55
पिंपरी-चिंचवड महापालिकेत संतापजनक प्रकार; तत्कालीन आयुक्तांनी मुख्य प्रवाहात आणलेल्या १६ तृतीयपंथी ‘ग्रीन मार्शल’ कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून बेरोजगारीची कुऱ्हाड?
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये सामाजिक समता जोपासत उपेक्षित तृतीयपंथी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक अत्यंत कौतुकास्पद व ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले होते. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या कार्यकाळात आरोग्य विभागांतर्गत सुरक्षा रक्षक व ‘ग्रीन मार्शल’ म्हणून १६ तृतीयपंथी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या निर्णयाचे संपूर्ण शहरातून कौतुक झाले होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेत कार्यरत असणारे प्रशासन अधिकारी तथा उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मनमानी व उदासीन कारभारामुळे आज या तृतीयपंथी कर्मचाऱ्यांवर थेट बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून अत्यंत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या या १६ कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून काढून टाकण्याचा घाट घातला जात असल्याने महापालिका मुख्यालयात प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागात विविध प्रभागांमध्ये काम करणाऱ्या इतर बड्या ठेकेदारांची मुदत संपल्यानंतर त्यांना कोणतीही अडकाठी न करता वेळोवेळी मुदतवाढ (Extension) दिली जाते. परंतु, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर पडून स्वाभिमानाने स्वतःचे पोट भरणाऱ्या या १६ कर्मचाऱ्यांच्या आणि प्रामुख्याने १६ तृतीयपंथी ‘ग्रीन मार्शल’ कर्मचाऱ्यांच्या कामाचा कोणताही योग्य आढावा न घेता किंवा पूर्वसूचना न देता त्यांची मुदतवाढ रोखून धरण्यात आली आहे.
इतर ठेकेदारांना तावातावाने मुदतवाढ देणारे अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल हे केवळ या तृतीयपंथी कर्मचाऱ्यांच्या सेवावाढीबाबतच जाणूनबुजून टाळाटाळ करत आहेत. या दुटप्पी भूमिकेमुळे, “इतर ठेकेदारांकडून काही ‘अर्थपूर्ण’ व्यवहार (मलई) उकळले जात आहेत का आणि म्हणूनच या उपेक्षित घटकावर अन्याय केला जात आहे का?” असा थेट आणि संतप्त सवाल आता पालिकेच्या वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
तृतीयपंथी समाज हा आधीच सामाजिक, आर्थिक आणि मानसिक उपेक्षेचा सामना करत असतो. अशा परिस्थितीत तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांना समाजात सन्मानाने जगण्याचा आणि रोजगाराचा मुख्य आधार मिळाला होता. मात्र, प्रशासकीय लालफितीचा कारभार आणि अधिकाऱ्यांच्या संवेदनहीन भूमिकेमुळे माजी आयुक्तांच्या एका चांगल्या आणि लोककल्याणकारी निर्णयाला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे.
या दुर्दैवी प्रकरणाची महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या तृतीयपंथी कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवावाढ द्यावी आणि त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जंगम साहेब आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी या गंभीर प्रकरणाकडे किती गांभीर्याने लक्ष देतात, प्रशासकीय पातळीवरील या त्रुटी किती दिवसांत दूर करून या उपेक्षित कर्मचाऱ्यांना न्याय देतात, याकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
