35
शिरगाव-परंदवडी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी: गौरी-गणपती उत्सवात देवीच्या मूर्तीवरून चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत; मोलकरणीला अटक!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
शिरगाव: गौरी-गणपती सणोत्सवादरम्यान घरातील एकविरा देवीच्या मूर्तीस चढवलेले तब्बल ३०.५४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र पेंडंटसह चोरी करणाऱ्या घरकामाच्या महिलेला शिरगाव-परंदवडी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कौशल्याने तपास करत चोरीस गेलेला २ लाख ८४ हजार ८४७ रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी गजरा सातप्पा कांबळे (वय ४५ वर्षे, रा. जिजामाता चौकाजवळ, आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, आकुर्डी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.
शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्यात दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी तक्रारदाराने उपस्थित राहून फिर्याद दिली होती की, गौरी-गणपती सणाच्या निमित्ताने घरातील एकविरा देवीच्या मूर्तीस घातलेले सोन्याचे मंगळसूत्र पेंडंटसह चोरीस गेले आहे. प्राप्त तक्रारीवरून शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८०/२०२६ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ अन्वये तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला. फिर्यादीच्या घरी घरकामासाठी येणाऱ्या महिलेवर संशय आल्याने पोलिसांनी तिच्या मानसिकतेचा अचूक अंदाज घेत कौशल्यपूर्ण पद्धतीने चौकशी केली. पोलिसांच्या खाकीचा खाक्या दाखवताच सदर महिलेनेच सोन्याचे मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी तात्काळ आरोपी महिला गजरा कांबळे हिला अटक करून न्यायालयात हजर केले असता, माननीय न्यायालयाने तिला ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीदरम्यानच्या तपासात आरोपीकडून २,८४,८४७ रुपये किमतीचे ३०.५४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र पेंडंटसह हस्तगत करण्यात आले आहे.
सदर कौतुकास्पद कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली, पोलीस उपायुक्त परिमंडळ ०४ श्रीमती श्वेता खेडकर व सहाय्यक पोलीस आयुक्त देहूरोड विभाग प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पारखे, पोलीस हवालदार किशोर गिरीगोसावी, सचिन काचोळे, पोलीस अंमलदार प्रसाद जंगीलवाड, दिलीप राठोड आणि सागर कोळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
