36
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिरात’ ३,५०० हून अधिक सफाई सेवकांची आरोग्य तपासणी संपन्न!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: शहराच्या स्वच्छतेची महत्त्वाची धुरा सांभाळणाऱ्या सफाई सेवकांच्या आरोग्याला आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिरांचे’ यशस्वी आयोजन करण्यात आले. २८ आणि ३० सप्टेंबर रोजी पार पडलेल्या या विशेष शिबिरांमध्ये ‘अ’ ते ‘ल’ अशा सर्व १० क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील तब्बल ३,५०० हून अधिक सफाई सेवकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. थेरगाव येथील स्व. कै. शंकरराव गावडे कामगार भवन येथेही या शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये सर्व सफाई मित्रांची हिमोग्लोबिन (Hb), रक्तदाब (BP), मधुमेह (Diabetes) यांसारख्या विविध वैद्यकीय चाचण्या मोफत करण्यात आल्या. तपासणीसोबतच आरोग्य तज्ज्ञांकडून संतुलित आहार, नियमित व्यायाम, योगासने, प्राणायाम, मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कामाच्या वेळी आवश्यक सुरक्षा साधनांचा (Safety Kits) वापर करणे आणि आजाराची प्राथमिक लक्षणे दिसताच वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले.

शिबिराप्रसंगी कचरा वेचकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपकरणांचे व साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, “सफाई सेवक हे शहराच्या स्वच्छतेचे मुख्य आधारस्तंभ आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही पालिकेची नैतिक जबाबदारी आहे. आरोग्यविषयक समस्या सुरुवातीच्या टप्प्यातच लक्षात आल्यास त्यावर वेळेत उपचार करता येतात. म्हणूनच पालिका प्रशासनाकडून सफाई मित्रांच्या आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे.”

या शिबिराच्या माध्यमातून समाज विकास विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध महिला व बालकल्याण योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. महिला बचतगट, विधवा व घटस्फोटित महिलांसाठी स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि व्यवसाय प्रशिक्षणासोबतच आर्थिक मदतीच्या योजनांची माहिती देऊन पात्र महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. ठेंगल यांनी केले.
या आरोग्य शिबिरास डॉ. शिवाजी ढगे, डॉ. शंकर मोसलगी, डॉ. कुलभूषण कुलकर्णी, डॉ. तुषार जाधव, सहायक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, राजेश भाट, अंकुश झिटे, अतुल सोनवणे, कांचनकुमार इंदलकर, योगेश फल्ले यांच्यासह सर्व आरोग्य निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि सफाई मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सहायक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
