50
अमरावतीत १५ दिवस कडक निर्बंध; नवदुर्गोत्सव व शारदोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी!
अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. ०१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: आगामी नवदुर्गोत्सव, शारदोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर व परिसर क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३६ अन्वये कडक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश दि. १३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत संपूर्ण अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लागू राहणार आहेत.
दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी घटस्थापना असून त्याच दिवशी नवदुर्गोत्सव, शारदोत्सव आणि नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. अमरावती पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी दुर्गादेवी आणि शारदादेवींच्या मूर्तींची भव्य मिरवणुकीसह स्थापना केली जाते.
तसेच प्रसिद्ध श्री अंबादेवी व एकविरादेवी मंदिर परिसरात भव्य यात्रेचे आयोजन केले जाते. नवरात्रीच्या ९ दिवसांत दर्शनासाठी लाखो भाविकांची, विशेषतः महिलांची प्रचंड गर्दी मंदिर परिसरात असते. याशिवाय शहरात विविध ठिकाणी रास-गरबा आणि दांडिया नृत्याचे भव्य आयोजन केले जाते. या सर्व पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
रस्त्यावरून जाणाऱ्या मिरवणुकीतील तसेच जमावातील व्यक्तींचे वर्तन कसे असावे, मिरवणुका कोणत्या मार्गाने व कोणत्या वेळेत काढाव्यात, याचे पूर्ण अधिकार संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांना राहतील. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर मोठ्या आवाजात गाणी गाणे, ढोल-ताशे व इतर कर्कश वाद्ये वाजवण्यावर पोलिसांचे पूर्ण नियंत्रण राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३४ अंतर्गत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
