53
पिंपरी-चिंचवड महापालिकेत पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची ऐतिहासिक विक्रमी वसुली; तब्बल ६१० कोटी ४४ लाख रुपये तिजोरीत जमा!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अत्यंत उत्कृष्ट, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध प्रशासकीय नेतृत्वाखाली कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्याच सहामाहीत इतिहास रचला आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच पहिल्या सहामाहीत तब्बल ६१० कोटी ४४ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात प्रशासनाला अभूतपूर्व यश आले आहे.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी राबवलेल्या लोकभिमुख धोरणांमुळे आणि पारदर्शक कार्यपद्धतीमुळे शहरातील तब्बल ६६.४७ टक्के मालमत्ताधारकांनी वेळेत कराचा भरणा करत शहर विकासात आपले योगदान दिले आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसुली प्रभावीपणे व्हावी, यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विशेष कृती आराखडा तयार केला होता. महिला बचत गटांच्या माध्यमातून बिलांचे घरपोच वाटप, रिक्षाद्वारे डिजिटल जनजागृती, आणि प्रत्येक नागरिकाला त्याच्या थकीत व सवलतीची अचूक माहिती देणारे SMS पाठवण्याची आधुनिक यंत्रणा त्यांनी कार्यान्वित केली.
या दूरदृष्टीपूर्ण नियोजनामुळेच गतवर्षीच्या ६०३ कोटी ८२ लाखांच्या तुलनेत यंदा ६ कोटी ६२ लाख रुपयांची अधिक वसुली झाली आहे. एक अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष प्रशासक म्हणून डॉ. विजय सूर्यवंशी यांनी राबवलेल्या मोहिमांमुळे करदात्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, जनसामान्यांमधून त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचे जोरदार स्वागत होत आहे.
पहिल्या सहामाहीचा लेखाजोखा
एकूण वसुली ६१० कोटी ४४ लाख रुपये, कर भरणारे नागरिक ५ लाख ९ हजार २०० मालमत्ताधारक (६६.४७%), ऑनलाइन भरण्याला पसंती तब्बल ४ लाख ४५ हजार मालमत्ताधारकांनी ४७१ कोटी ८३ लाख रुपयांचा कर डिजिटल/ऑनलाइन माध्यमातून भरला, मालमत्तांचे प्रकारनिहाय संकलन निवासी: ४,५१,७३९ , बिगरनिवासी: ४०,१९७ , मिश्र: १०,०४४ , औद्योगिक: ३,६६७ , मोकळ्या जमिनी: ३,४८९
महापालिकेच्या १८ करसंकलन विभागीय कार्यालयांमध्ये वाकड कार्यालयाने सर्वाधिक ८४ कोटी ९१ लाख रुपयांची वसुली करत प्रथम क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ थेरगाव (५३ कोटी १५ लाख), कस्पटे वस्ती (४५ कोटी १९ लाख), किवळे (४४ कोटी ९१ लाख), पिंपरी नगर (४४ कोटी ९९ लाख) आणि चिखली (४४ कोटी ६१ लाख) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
मागील चार वर्षांतील सहामाही वसुलीचा आलेख
वर्ष २०२३-२४ ५९० कोटी ६० लाख रुपये, वर्ष २०२४-२५ ५१२ कोटी ६२ लाख रुपये, वर्ष २०२५-२६ ६०३ कोटी ८२ लाख रुपये, वर्ष २०२६-२७ ६१० कोटी ४४ लाख रुपये (विक्रमी).
“मालमत्ता कर हा महापालिकेच्या महसुलाचा मुख्य आधार आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्या सहामाहीत प्रथमच ६१० कोटींचा टप्पा पार झाला आहे. कर भरून शहराच्या विकासात थेट योगदान देणाऱ्या सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार. यापुढील काळात थकीत मालमत्ताधारकांकडून १०० टक्के कर वसुलीला प्राधान्य दिले जाईल.”— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
“१८ करसंकलन कार्यालयांचे उद्दिष्टनिहाय नियोजन करण्यात आले होते. नियमित आढावा बैठका आणि वसुलीच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवल्यामुळेच हे ऐतिहासिक यश मिळवता आले आहे.”— तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
“नागरिकांना सहज व सुलभ रीतीने सवलतीचा लाभ घेता यावा यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात आली. पहिल्या सहा महिन्यांत ६६.४७ टक्के वसुली झाली असून, पुढील सहा महिन्यांत उर्वरित ३३.५२ टक्के थकबाकी व चालू कर १०० टक्के वसूल करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.”— सचिन पवार, उपायुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
