26
पीसीयू मधील उच्च सुविधांचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी कौशल्य सिद्ध करावे: कुलपती हर्षवर्धन पाटील
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
साते, वडगाव मावळ: भविष्यातील तंत्रज्ञानाशी समन्वय साधणाऱ्या “इंडस्ट्री ५.० आणि फ्युचर टेक्नॉलॉजीज सेंटर ऑफ एक्सलन्स” या अत्याधुनिक सुविधा पिंपरी चिंचवड विद्यापीठ (PCU) परिसरात उपलब्ध करून देणे हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. येथे विद्यार्थ्यांना नवोन्मेषाचे प्रत्यक्ष प्रयोग करण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी संधी मिळेल. या उच्च तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांनी पूर्ण उपयोग करून घ्यावा आणि आपले कौशल्य सिद्ध करावे. हा प्रकल्प विद्यार्थ्यांच्या अंगभूत संशोधन आणि उद्योजक गुणांना मोठी संधी उपलब्ध करून देणारे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ कॅम्पसमध्ये “इंडस्ट्री ५.० आणि फ्युचर टेक्नॉलॉजीज सेंटर ऑफ एक्सलन्स” चे उद्घाटन पीसीयूचे कुलपती व पीसीईटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील आणि ज्येष्ठ उद्योजक पद्मश्री प्रतापराव पवार यांच्या शुभहस्ते पार पडले.
यावेळी बोलताना पद्मश्री उद्योजक प्रतापराव पवार म्हणाले की, एआय (AI), रोबोटिक्स, ऑटोमेशन, सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक व्हेईकल यांसारखी क्षेत्रे भविष्यातील उद्योग विश्वात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ संस्था आणि विद्यापीठ यांच्यातील सहकार्यामुळे शिक्षण अधिक परिणामकारक आणि रोजगार वाढीस चालना देणारे ठरेल. पीसीयूने भविष्यातील गरजा ओळखून सुरू केलेला “इंडस्ट्री ५.० आणि फ्युचर टेक्नॉलॉजी सेंटर ऑफ एक्सलन्स” हा प्रकल्प विद्यार्थ्यांच्या आणि उद्योगांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल.

पीसीयू व टाटा मोटर्स डिप्लोमा प्रमुख डॉ. उमेश पोतदार यांनी सांगितले की, हा प्रकल्प पीसीयू-टाटा मोटर्सच्या मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी मधील डिप्लोमा प्रोग्रामसह केनिया आणि झांझिबार येथील विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित केलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
प्रा. रामकृष्ण वडाली यांनी माहिती देताना सांगितले की, सी-डॅक पुणे (C-DAC), डिजिटेक रोबोटिक इंडिया प्रा. लि. आणि एएमडी (AMD) यांच्या सहकार्याने या उच्च क्षमता असणाऱ्या १६ प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. येथे विद्यार्थ्यांसह संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील.
या केंद्रात प्रामुख्याने इंडस्ट्रियल ऑटोमेशन व मेकॅट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल रोबोटिक्स व एआय रोबोटिक्स, स्मार्ट फॅक्टरी ऑटोमेशन विथ IIoT, इंडस्ट्रियल व्हर्च्युअल फॅक्टरी ऑटोमेशन अँड डिजिटल ट्विन, मशीन लर्निंग व हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग, इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) व ड्रोन टेक्नॉलॉजी, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग व सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स्ड एम्बेडेड IoT, AIoT आणि संशोधन प्रयोगशाळा (R&D Lab) यांचा समावेश करण्यात आला आहे.
या उद्घाटन सोहळ्याला पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, पीसीयू व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, आयटी व आयटीईएस प्रमुख डॉ. रामकृष्ण वडाली, पीसीयू फोर्ब्स मार्शल प्रमुख राजेश पाटील, डिजिटेक रोबोटिक इंडियाचे सीईओ फाऊंडर अजित गटे, लि आम, गजानन पाटील यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

