66
ज्येष्ठांनी योग्य गुंतवणूक करून सुरक्षित आर्थिक जीवन जगावे: पूनम शर्मा
सांगवी प्रतिनिधी सुनील पोकरे, दि. ०१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
सांगवी: निवृत्तीनंतरचा काळ हा आयुष्याचा आनंद घेण्याचा काळ असतो. मात्र या काळात नियमित उत्पन्न कमी झाल्यानंतर दैनंदिन खर्च, आरोग्यविषयक गरजा, वाढती महागाई आणि कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता यांचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी योग्य गुंतवणुकीचे नियोजन करून आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व चिंतामुक्त जीवन जगावे, असे आवाहन बँक ऑफ बडोदाच्या मुख्य व्यवस्थापक पूनम शर्मा यांनी केले.
पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे शितोळेनगर येथील लिटल फ्लॉवर स्कूलच्या सभागृहात १ ऑक्टोबर रोजी ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित ‘निवृत्तीनंतरचे सुरक्षित आर्थिक जीवन’ या मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कार्यक्रमास बँक ऑफ बडोदाच्या मुख्य व्यवस्थापक पूनम शर्मा आणि सहाय्यक व्यवस्थापक अमित कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी अमित कांबळे यांनी बँक ऑफ बडोदाच्या कार्याची आणि विविध बँकिंग सेवांची सविस्तर माहिती दिली. बँक ऑफ बडोदा आणि इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी हे विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. मुख्य व्यवस्थापक पूनम शर्मा यांनी पुढे सांगितले की, बँक ऑफ बडोदेला ११९ वर्षे पूर्ण झाली असून ग्राहकांना दर्जेदार व विश्वासार्ह बँकिंग सेवा देण्यावर बँकेचा सातत्याने भर आहे. अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी ज्येष्ठांनी बँकेच्या शाखेला नक्की भेट द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सरचिटणीस ईश्वरलाल चौधरी, कार्याध्यक्ष अशोक चव्हाण, माजी अध्यक्ष चंद्रकांत चोपडे यांच्यासह सुमारे ४० ते ५० ज्येष्ठ सभासद उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ सभासद विमल ढोकळे आणि पार्वती एन. मुखर्जी यांचा वाढदिवस साजरा करून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी स्वागत, प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर उपस्थित सर्व सभासदांनी अल्पोपहार व चहाचा आस्वाद घेतला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

