27
महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये ८.५७ लाख कोटींचे ६७ सामंजस्य करार; २.९१ लाख नवीन रोजगारनिर्मितीचा मार्ग सुकर!
मुंबई, विशेष प्रतिनिधी दि. ०१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
मुंबई: महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला आणि रोजगाराला अभूतपूर्व गती देणारा निर्णय आज पार पडला. ‘महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिट’मध्ये राज्याच्या आर्थिक पटलावर ऐतिहासिक क्रांती घडवत ८ लाख ५७ हजार ४५२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे तब्बल ६७ सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हे करार संपन्न झाले असून, या माध्यमातून राज्यात २ लाख ९१ हजार १०९ प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची मोठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या समिटमध्ये भविष्यातील तंत्रज्ञानावर आधारित उद्योग, हरित ऊर्जा, संरक्षण आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी मोठा उत्साह दाखवला.
डेटा सेंटर्स, आयटी व सेमिकंडक्टर (प्रथम क्रमांकावर) आधुनिक तंत्रज्ञानाचे केंद्र बनत असलेल्या महाराष्ट्रात डेटा सेंटर्स, माहिती-तंत्रज्ञान आणि सेमिकंडक्टर क्षेत्रात सर्वाधिक ४ लाख १५ हजार ४९० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित करण्यात आली आहे.
पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मिती, बॅटरी एनर्जी स्टोरेज आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) क्षेत्रात १ लाख २ हजार ५१९ कोटी रुपयांचे एकूण १० महत्त्वाचे करार करण्यात आले.
मेटल्स आणि मायनिंग (धातू व खाणकाम) क्षेत्रात ७५ हजार कोटी, तर स्टील उत्पादन क्षेत्रात ७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
संरक्षण आणि अंतरिक्ष तंत्रज्ञान क्षेत्रात १० करारांच्या माध्यमातून २७ हजार ९३० कोटी रुपयांचे भांडवल येणार आहे.
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र १२,६५१ कोटी रुपये, आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्र ६,५०० कोटी रुपये, पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स व बांधकाम साहित्य १८,७५१ कोटी रुपये , केमिकल्स, शेती, सेवा आणि GCC (ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स) ८,८०१ कोटी रुपये, इतर विविध उद्योग क्षेत्रे १ लाख ८२ हजार ८१० कोटी रुपये
महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटच्या माध्यमातून पार पडलेल्या या करार सोहळ्यास उद्योग जगतातील अनेक दिग्गज, प्रशासकीय अधिकारी आणि गुंतवणूकदार उपस्थित होते. या करारामुळे राज्यातील औद्योगिक विस्तार वेगाने होऊन महाराष्ट्राचे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे स्वप्न पूर्ण होण्यास तसेच तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
