मेट्रो स्थानकांवरील गर्दी, जाहिराती आणि खड्ड्यांचा प्रश्न; प्रदीप गायकवाड यांनी महामेट्रोला दिले निवेदन
प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी एन्ट्री-एक्झिट मार्ग वाढवण्याची मागणी, महामेट्रोने सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती
पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे, ११ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर काही समस्या समोर आल्या आहेत. याच समस्यांवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी श्री. चंद्रशेखर तांबवेकर यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. या मागण्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन तांबवेकर यांनी दिले आहे.
प्रवाशांना रांगेतून मुक्ती हवी
मेट्रो स्थानकांवर प्रवाशांना आत जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी लागणाऱ्या लांब रांगांमुळे अनेकदा १० ते १५ मिनिटे वाया जात आहेत. यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ खर्च होतो. ही समस्या कमी करण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर आणखी दोन अतिरिक्त ‘एन्ट्री’ आणि ‘एक्झिट’ मार्ग वाढवावेत, अशी मागणी प्रदीप गायकवाड यांनी केली.
जाहिराती आणि खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती
या निवेदनात वाहतूक आणि सुरक्षिततेच्या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता. दापोडी ते चिंचवडपर्यंत मेट्रोच्या खांबांवर लावण्यात आलेल्या आकर्षक जाहिरातींमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होत असून, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. या जाहिराती चार ते पाच खांब सोडून लावाव्यात, अशी सूचना त्यांनी केली.
त्याचप्रमाणे, निगडी ते चिंचवड या नवीन मेट्रो मार्गाचे काम सुरू असल्याने सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमुळे गंभीर अपघात होण्याचा धोका वाढला आहे. पाऊस थांबल्यामुळे हे खड्डे तातडीने भरून काढण्याची मागणीही गायकवाड यांनी केली.
चंद्रशेखर तांबवेकर यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देऊन, तातडीने उपाययोजना करण्याची ग्वाही दिली आहे.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
