गोतस्कराचा प्रयत्न हाणून पाडला! मूर्तिजापूर पोलीसांनी दोन गोवंशांना दिले जीवनदान
कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या आरोपीकडून ३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त; ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत पोलिसांची मोठी कारवाई
मूर्तिजापूर, प्रतिनिधी दीपक थोरात, दि. २ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
मूर्तिजापूर शहर पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मोठी आणि संवेदनशील कारवाई करत कत्तलीसाठी निर्दयीपणे बांधलेल्या दोन गोवंशांना जीवनदान दिले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून, त्याच्याकडून ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
- माहिती: टाटा एस (क्रमांक एमएच ११ बी एल १३९७) वाहनातून दोन गोवंशांना कत्तलीकरीता घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती हेड कॉन्स्टेबल सुरेश पांडे यांना मिळाली.
- कारवाई: माहिती मिळताच, ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर नाक्यावर तातडीने नाकाबंदी करण्यात आली.
- आरोपी: यावेळी रोेशन पुऱ्यातील शेख नदीम शेख यासीन (वय २७ वर्ष) हा व्यक्ती गोवंशांना घेऊन जात असताना आढळून आला.
- गुन्हा: आरोपीने दोन गोवंशांना तोंडाला व पायाला आखुड दोरीने निर्दयतेने बांधले होते, तसेच त्यांच्या चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था केली नव्हती.
पोलिसांनी आरोपी शेख नदीम शेख यासीन याच्याविरोधात महा प्राणी संरक्षण अधीनियम १९७६ (सुधारणा अधी २०१५) च्या कलम ५, ५ (ब), ९, ९ (अ) सह प्राण्यास निर्दयतेने वागविणे कायदा १९६० चे कलम ११ (१) (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
- जप्ती: आरोपीकडून ५० हजार रुपये किमतीचे २ बैल आणि ३ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
- जीवनदान: दोन्ही गोवंशांना चारा पाण्याची व राहण्याची योग्य व्यवस्था होण्यासाठी येथील पुंडलीकबाबा गोरक्षण संस्थेच्या सुपूर्द करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांनी राबवीलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत रेडडी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजित जाधव, हेड कॉन्स्टेबल सुरेश पांडे, नंदकीशोर टिकार, कॉन्स्टेबल सचिन दुबे, गजानन खेडकर यांनी ही महत्त्वपूर्ण कार्यवाही केली.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
