news
Home पिंपरी चिंचवड PCMC ची ३५ लाख लोकसंख्येसाठी तयारी! कावेरीनगर येथे उच्च दर्जाची २५ लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी व संपवेल समर्पित

PCMC ची ३५ लाख लोकसंख्येसाठी तयारी! कावेरीनगर येथे उच्च दर्जाची २५ लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी व संपवेल समर्पित

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे आणि माजी सभापती ममता गायकवाड उपस्थित; विद्युत विभागाने ५० एचपी क्षमतेचे २ पंप बसवले; मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी मानले आभार. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

वाकड परिसरात पाण्याची चिंता मिटणार! २५ लाख लिटर क्षमतेच्या टाकीचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

 

५ कोटी ८५ लाख रुपये खर्चून उभारलेल्या टाकीमुळे कस्पटेवस्ती, कावेरीनगरसह विविध भागांना मिळणार सुरळीत पाणीपुरवठा

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि.२२ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) पाणीपुरवठा विभागाच्या वतीने वाकड परिसरातील कावेरीनगर येथे उभारण्यात आलेल्या २५ लाख लिटर क्षमतेच्या उंच पाण्याच्या टाकीचे आज, २१ नोव्हेंबर २०२५ रोजी लोकार्पण झाले. आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते या टाकीचे आणि संपवेलचे उद्घाटन करण्यात आले. या नवीन सुविधेमुळे वाकड परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार शंकर जगताप यांनी नमूद केले की, या टाकीमुळे वाकड परिसरातील कस्पटेवस्ती, पिंक सिटी रस्ता परिसर, वेणूनगर, कावेरीनगर, पोलीस कॉलनी, दत्त मंदिर रस्ता आदी परिसरातील गृहसंकुले अशा विविध भागातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल.

आमदार शंकर जगताप म्हणाले, “पिंपरी चिंचवड शहराचा झपाट्याने विकास होत असून शहराची लोकसंख्या देखील जवळपास ३५ लाखांपर्यंत गेली आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून येणाऱ्या काळात शहरातील सर्व नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून, त्यांना राज्य सरकारकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य केले जाईल. महापालिकेने कावेरीनगर परिसरात उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे काम उच्च दर्जाचे केले आहे.”

कावेरीनगर, वाकड येथील वॉर्ड क्र. ५३, स. नं. २०८ मध्ये महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ५ कोटी ८५ लाख रुपये खर्च करून ही २५ लाख लिटर्स क्षमतेची पाण्याची उंच टाकी व संपवेल उभारले आहे.

या नवीन टाकीतून परिसराला नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाने विशेष प्रयत्न केले आहेत.

सह शहर अभियंता (विद्युत) अनिल भालसाखळे यांनी सांगितले की,

  • येथे नवीन पंप हाऊस उभारण्यात आले आहे.

  • या टाकीत पाणी भरण्यासाठी ५० एचपी क्षमतेचे २ वर्किंग आणि १ स्टँडबाय पंप बसवण्यात आले आहेत.

  • या पंपांच्या साहाय्याने संपूर्ण टाकी फक्त ६ तासांतच भरणार आहे.

  • पंप हाऊससाठी २०० केव्हीए स्वतंत्र वीज भार मंजूर असून, त्यासाठी स्वतंत्र २०० केव्हीए क्षमतेचे रोहित्र संच व उच्च दाब नियंत्रणासाठी २ आरएमयू देखील बसविण्यात आले आहेत.

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “शहरातील प्रत्येक नागरिकासाठी मुबलक पाणीपुरवठा मिळणे ही महत्त्वाची बाब असते. त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभी करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सातत्याने विविध प्रकल्प हाती घेतले जात आहेत.”

या कार्यक्रमास महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, स्थायी समितीच्या माजी सभापती ममता गायकवाड, माजी नगरसदस्य विनायक गायकवाड, संदीप कस्पटे, आरती चौंधे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, अनिल भालसाखळे, क्षेत्रीय अधिकारी आश्विनी भोसले, कार्यकारी अभियंता महेश बरिदे, महेश कावळे, हेमंत देसाई, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उपअभियंता प्रविण धुमाळ, मनोज बोरसे, विश्वनाथ पाडवी, अमरजित म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते सचिन साठे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अनिल देशमुख, अध्यक्षा वृषालीताई मरळ, ग्लेग इंजिनिअर्सचे मोहनलाल शर्मा यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, विविध सामाजिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण धुमाळ यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!