पिंपरी-चिंचवडच्या गुणीजनांचा महापौरांच्या हस्ते होणार सन्मान! कलाकार, खेळाडू आणि साहित्यिकांच्या गौरवार्थ समितीचा ऐतिहासिक ठराव; विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांचा पुढाकार
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २८ मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष:
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या आणि राज्य व राष्ट्रीय स्तरावर शहराचे नाव उंचावणाऱ्या कलाकार, खेळाडू तसेच साहित्यिकांचा गौरव आता महानगरपालिकेच्या वतीने अधिक अधिकृतरीत्या केला जाणार आहे. या गुणवंतांचा सन्मान महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव पालिकेच्या क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.
समितीचे सभापती कैलास कुटे यांच्या अध्यक्षतेखाली दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात ही आढावा बैठक पार पडली. यावेळी शहरातील सांस्कृतिक आणि क्रीडा धोरणांवर सखोल चर्चा करण्यात आली.
विरोधी पक्षनेते तथा समितीचे सदस्य भाऊसाहेब भोईर यांनी हा अभिनव प्रस्ताव मांडला. शहरात अनेक प्रतिभावान व्यक्ती आहेत ज्यांची दखल घेणे प्रशासनाचे कर्तव्य आहे, या भावनेतून हा ठराव मांडण्यात आला. याला समितीच्या सर्व सदस्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात मंजुरी दिली. या उपक्रमामुळे स्थानिक कलाकारांना आणि खेळाडूंना नवीन उभारी मिळणार असून, त्यांच्या कर्तृत्वाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यास मदत होणार आहे.
याच बैठकीत पुणे महापौर चषक या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या महिला संघाचा विशेष सन्मान करण्यात आला. सभापती कैलास कुटे यांच्या हस्ते संघातील खेळाडूंना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
सन्मानित खेळाडू:
मनीषा राठोड, रेखा राठोड, कोमल राठोड, शिफा वस्ताद, सविता गवई, भूमिका गोरे, विधा गायकवाड, निकिता माळी, पूजा तेलंग, श्रावणी सावंत, रूपाली डोंगरे, कीर्ती कडगंची, प्रीती केरळकर आणि नंदिनी साधू.
या बैठकीस समिती सदस्य शाम जगताप, धर्मपाल तंतरपाळे, उदय गायकवाड, योगेश लांडगे, प्रमोद कुटे तसेच उपायुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
