हिंजवडी पोलिसांच्या जाळ्यात ‘एमडी’ तस्कर; २७ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दिनांक: २ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:
हिंजवडी: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी अमली पदार्थ विक्री आणि बाळगणाऱ्यांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून कारवाई करत २७ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आंतरजिल्हा तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
२४ मार्च २०२६ रोजी हिंजवडी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ आणि त्यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार नरेश बलसाने यांना खात्रीशीर माहिती मिळाली. एक इसम वाकड येथील विनोदे वस्ती येथे चारचाकी गाडीतून एम.डी. (मेफेड्रोन) विक्रीसाठी येणार असल्याचे समजले.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी विनोदे वस्ती ते आल्हाट वस्तीकडे जाणाऱ्या रोडवर सापळा लावला. पोलिसांनी संशयास्पदरीत्या आलेल्या अतुल शंकर बालगुडे (वय ३५, रा. पाथरी, ता. मावळ) याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत ४ लाख २० हजार रुपये किमतीचे ४२ ग्रॅम एम.डी. आणि ३ लाख २४ हजार रुपये किमतीची कार व इतर साहित्य असा एकूण ७ लाख ४४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अतुल बालगुडे याची कसून चौकशी केली असता, या गुन्ह्यात त्याचे मुंबई कनेक्शन समोर आले. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून मुंबईतील गोवंडी परिसरातून त्याचा साथीदार शारुख उर्फ सद्दाम इक्बाल अंसारी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल २० लाख रुपये किमतीचे २०० ग्रॅम एम.डी. जप्त करण्यात आले. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी आतापर्यंत २७ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दोन्ही आरोपींविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १८४/२०२६ नुसार एन.डी.पी.एस. (NDPS) ॲक्ट कलम ८(क), २२(ब)(क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, डॉ. बसवराज तेली, उपायुक्त विशाल गायकवाड, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) ऋषिकेश घाडगे, सपोनि सोमनाथ पांचाळ, सपोनि दुर्गानार्थ साळी, आणि अंमलदार नरेश बलसाने, चिंतामणी जोशी, कैलास केंगले, संदीप मासाळ, विजय गेंगजे, प्रशांत गिलबिले, कबीर पिंजारी, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, विशाल भोईर व अरुण पारधी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

