अकोला बाजार समितीत तुरीची मोठी आवक; सहा दिवसांत ८ हजार क्विंटलची नोंद, शनिवारी मिळाला सर्वाधिक दर
विदर्भ ब्युरो चीफ विलास सावळे, मूर्तिजापूर, दिनांक: ०८ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:
अकोला: अकोला जिल्ह्यात तुरीचे पीक काढणीनंतर आता बाजारपेठेत तुरीची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गेल्या महिनाभरापासून कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक सुरू असून, गेल्या सहा दिवसांत तब्बल ८ हजार क्विंटल तुरीची नोंद झाली आहे. यामध्ये दरातील चढ-उतार पाहायला मिळत असून शनिवारी शेतकऱ्यांना सर्वाधिक ८,२७० रुपये सरासरी दर मिळाला आहे.
बाजार समितीत दिवसनिहाय झालेली आवक आणि मिळालेले दर खालीलप्रमाणे आहेत:
| दिनांक / वार | आवक (क्विंटल) | किमान दर (रु.) | कमाल दर (रु.) | सरासरी दर (रु.) |
| मंगळवार (७ एप्रिल) | २,२०० | ७,००० | ८,०९५ | ८,०६० |
| सोमवार (६ एप्रिल) | १,३०९ | ७,००० | ८,००० | ८,२५५ |
| शनिवार (४ एप्रिल) | १,६७४ | ७,००० | ८,३५० | ८,२७० |
| शुक्रवार (३ एप्रिल) | १,२४५ | ६,५०० | ८,४५५ | ८,२०० |
| बुधवार (१ एप्रिल) | १,५८१ | ७,००० | ८,२३५ | ८,१५० |
अकोला जिल्ह्यात यावर्षी तुरीच्या क्षेत्रात (हेक्टरमध्ये) मोठी वाढ झाली असून तालुकानिहाय पेरणी खालीलप्रमाणे आहे:
-
मूर्तिजापूर: ११,२६९
-
बाळापूर: ११,४०३
-
अकोला: १०,९००
-
बार्शीटाकळी: ९,३००
-
तेल्हारा: ६,१००
-
पातूर: ५,६४०
-
अकोट: ५,१५०
-
एकूण क्षेत्र: ५९,७६२ हेक्टर
जिल्ह्यात यावर्षी एकूण क्षेत्राच्या सरासरी ९९ टक्के क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे. पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळाले असून, अजूनही बाजार समितीत तुरीची आवक सुरूच आहे.
“बाजार समितीत मंगळवारी २२०० क्विंटल तूर आली असून शेतकऱ्यांना सरासरी ८०६० रुपयांचा दर मिळाला आहे. जिल्ह्यात यंदा विक्रमी पेरणी झाल्याने शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात माल असून आवक अजून काही दिवस कायम राहील.”
— सुनील मालोकार, सचिव, बाजार समिती, अकोला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

