news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी पालिकेचा ‘ग्रीन’ उपक्रम! जागतिक बँकांच्या मदतीने ऊर्जा बचतीचे उद्दिष्ट; आयुक्तांनी दिला प्रत्यक्ष कृतीचा आदेश

पिंपरी पालिकेचा ‘ग्रीन’ उपक्रम! जागतिक बँकांच्या मदतीने ऊर्जा बचतीचे उद्दिष्ट; आयुक्तांनी दिला प्रत्यक्ष कृतीचा आदेश

वीज खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका सरसावली; एसी आणि वॉटर पंपांच्या वापरात होणार मोठे बदल | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

ऊर्जा बचत धोरणाबाबत महापालिकेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; केवळ अहवाल नको, प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर द्या – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १३ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “महापालिकेच्या इमारतींमध्ये ऊर्जा बचतीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम हे केवळ अभ्यास, अहवाल आणि सादरीकरणांपुरते मर्यादित राहता कामा नयेत. प्रत्यक्ष अंमलबजावणीतून वीज वापरात लक्षणीय बचत आणि कार्यक्षम ऊर्जा व्यवस्थापनाचे ठोस परिणाम दिसून येणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इमारतींमध्ये ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा अवलंब करून वीज बचत, खर्च नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धन साध्य करण्याच्या उद्देशाने आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘अलांयन्स् फॉर एनर्जी इफिशिएंट इकॉनॉमी’ (AEEE) सोबत यापूर्वीच सामंजस्य करार केला आहे. या अंतर्गत  एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB), अलांयन्स् फॉर एनर्जी इफिशिएंट इकॉनॉमी (AEEE), कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरोमेंट अँड वॉटर (CEEW) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नियोजन प्रक्रिया सुरू आहे.

बैठकीमध्ये प्रकल्पाच्या विविध टप्प्यांवर संगणकीय सादरीकरण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने पुढील मुद्द्यांवर चर्चा झाली.  महापालिकेची आर्थिक स्थिती आणि ऊर्जा खर्चाचा विश्लेषण अहवाल,  प्री-फिजिबिलिटी स्टडी आणि ऊर्जा बचतीच्या संधींचा शोध, प्रकल्पासाठी आवश्यक गुंतवणूक, निधी उभारणीचे पर्याय आणि आर्थिक मॉडेल.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रशासकीय इमारतींमधील एसी यंत्रणा, वॉटर पंप आणि अन्य विद्युत उपकरणांच्या ऊर्जा वापराचे व्यवस्थापन प्रभावी करण्याच्या सूचना दिल्या. केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता, प्रत्यक्ष ऊर्जा बचतीचे मोजमाप (Measurement) होईल अशा पद्धतीने वेळबद्ध नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

“ऊर्जा बचत ही केवळ आर्थिक गरज नसून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.”

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!