news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी महापालिकेची मान्सूनपूर्व पूर्वतयारी! विधी समितीकडून ५० ‘आपदा मित्रांच्या’ नियुक्तीला ग्रीन सिग्नल

पिंपरी महापालिकेची मान्सूनपूर्व पूर्वतयारी! विधी समितीकडून ५० ‘आपदा मित्रांच्या’ नियुक्तीला ग्रीन सिग्नल

सभापती सुजाता बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक; कंत्राटी नियमांनुसार मिळणार मानधन, पूरपरिस्थितीत बजावणार महत्त्वाची भूमिका | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

विधी समिती सभेत पावसाळा कालावधीत आपदा मित्र स्वयंसेवकांची प्रायोगिक तत्वावर नेमणूक करण्यास मंजुरी

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, १४ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कामकाज अधिक गतिमान आणि सक्षम करण्यासाठी विधी समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पावसाळा कालावधीत निर्माण होणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित आणि अनुभवी “आपदा मित्र” स्वयंसेवकांची प्रायोगिक तत्त्वावर नियुक्ती करण्याच्या विषयास आज मंजुरी देण्यात आली.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात ही बैठक विधी समिती सभापती सुजाता बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

मान्सूनपूर्व तयारी २०२६ अंतर्गत पावसाळ्यातील पूरस्थिती, पाणी साचणे, झाडे पडणे किंवा इतर कोणत्याही दुर्घटनांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

शासनमान्य संस्थांकडून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले “आपदा मित्र”, राज्य अग्निशमन दल तसेच नागरी संरक्षण दलातील (Civil Defence) प्रशिक्षित स्वयंसेवकांची यात नियुक्ती केली जाईल. नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून पुढील ५ महिन्यांच्या कालावधीसाठी किमान ५० अनुभवी स्वयंसेवक तैनात केले जातील. या स्वयंसेवकांना कामगार कल्याण विभागाकडील कंत्राटी कामगारांच्या किमान वेतन दरानुसार मानधन अदा करण्यात येणार आहे.

हे स्वयंसेवक महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समन्वयाने काम करणार आहेत. विविध आपत्कालीन घटनांमध्ये तातडीने प्रतिसाद देणे, बचावकार्यामध्ये मदत करणे, पूरपरिस्थितीमध्ये नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे आणि मुख्य आपत्कालीन यंत्रणांना सहकार्य करणे अशी महत्त्वाची जबाबदारी हे आपदा मित्र पार पाडतील. या निर्णयामुळे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.

या बैठकीस विधी समिती सदस्य ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, श्रुती डोळस, कुशाग्र कदम, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, तुषार सहाणे यांच्यासह नगरसचिव मुकेश कोळप, उप आयुक्त संदीप खोत, राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी, विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल आदी उपस्थित होते.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!